बांदा/प्रतिनिधी
सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यातील सर्व संगीत व भजन क्षेत्रातील वारकरी भजन मंडळी, वादक, तबलावादक, कीर्तनकार तसेच अन्य भजनकलावंत यांना “भजन कलाकार संघटना सिंधुदुर्ग” या नव्याने स्थापन झालेल्या संघटनेच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही बैठक शासन दरबारी मान्यता मिळविणे, संघटनेचे कार्यकारी मंडळ स्थापन करणे तसेच कलाकारांच्या समस्या, मानधन, विमायोजना आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ कलाकारांना मिळवून देण्यासाठी चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. हि बैठक शुक्रवार दिनांक १७ रोजी सकाळी १०.३० वाजता मळगाव येथील पेडणेकर सभागृहात होणार आहे.
या बैठकीस अध्यक्ष म्हणून भजन कलाकार संघटना सिंधुदुर्ग चे अध्यक्ष संतोष कानडे बुवा उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून माजी सभापती प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, शिवसेना सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, वेंगुर्ला तालुका प्रमुख शिवसेना नितीन मांजरेकर, सिंधुदुर्ग बँक संचालक विद्याधर परब, मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ही बैठक शुक्रवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता पेडणेकर सभागृह, मळगाव येथे पार पडणार असून सर्व भजन कलाकार, वादक, कीर्तनकार यांनी उपस्थित राहून या बैठकीस यशस्वी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
भजन कलाकार संघटना सिंधुदुर्गची १७ ऑक्टोबरला मळगाव येथे बैठक
