मालवण (प्रतिनिधी)
मालवणची ग्रामदैवते श्री देव नारायण आणि रामेश्वर यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा बलि प्रतिपदा म्हणजे दीपावली – पाडव्यानिमित्त २२ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता सुरू होणार आहे. भाविकांनी यात मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरी इ. देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.
मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांचा वार्षिक पालखी २२ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता श्री देव रामेश्वर मंदिर येथून निघून श्री देव नारायण, श्रीदेवी पावणाई, श्रीदेवी भावई, श्रीदेवी सातेरी या सर्व देवतांना सांगणे करून आडवण मार्गे तानाजी नाका, श्री देव भूतनाथ मंदिर येथे थांबून समुद्रमार्गे मोरेश्वर (मोरयाचा धोंडा) येथे थांबेल. त्यानंतर दांडेश्वर मंदिर येथून श्री देवी काळबादेवी मंदिर येथे थांबून जोशी मांडी येथे येईल व त्यानंतर नगर वाचनालयाकडून सोमवार पेठेतील श्रीदेव रामेश्वर मांड येथे भाविकांच्या दर्शनासाठी प्रतिवर्षाप्रमाणे थांबून बाजारपेठ भरड मार्गे देऊळवाडा येथे मंदिरात येईल.
पालखी सोहळ्यामुळे मालवण नगरीला जत्रेचे स्वरूप प्राप्त होत असते. दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी ग्रामदैवत रामेश्वर व नारायणाची पालखी प्रदक्षिणा तसेच रामेश्वर, नारायण आणि त्यांची बहीण काळाबादेवीचा पारंपारिक भाऊबीज सोहळा मोठ्या थाटात साजरा होत असतो. ग्रामदेवतांची पालखी सजवण्यात येत असते. भूतनाथ येथे पालखीसोबत आलेल्या मानकरी, प्रजाजनांना बोडवे-गावकर यांच्याकडून श्रीफळ भेट देऊन स्वागत करण्यात येते. दुपारी एक वाजता रामेश्वर व नारायणाचे वर्सलदार कुटूंबीय आणि गावकर मानकऱ्यांना रामेश्वरासमोर श्रीफळ ठेऊन गाऱ्हाणे घालतात. ढोल -ताश्यांच्या गजरात रामेश्वर व नारायणाची पालखी मालवणच्या परिक्रमेसाठी बाहेर पडते
यावर्षी पालखी सोहळ्याला मालवणात प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. पाऊसही गेलेला असल्याने आणि बाजारपेठांमध्ये उत्साह असल्याने आताची पालखी सोहळा न भूतो न भविष्यती असाच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. देवस्थान ट्रस्टतर्फे सोहळा उत्साहात होण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात येत आहे.
तरी या पालखी सोहळ्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टतर्फे यांनी केले आहे.
