मळेवाड सोसायटीचे चेअरमन व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश: तर मळेवाडी जिल्हा परिषद वर शिवसेनेचा भगवा फडकवणार..
⚡सावंतवाडी ता.०९-: मळेवाड गावातील सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि उबाठा विभागातील शिवसेनेचे सर्व कार्यकर्त्यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत आज जाहीर पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते संजू परब यांनी नव्या कार्यकर्त्यांचे उत्साहात स्वागत केले.
यावेळी बोलताना संजू परब यांनी सांगितलं की गावाच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य निश्चितपणे करण्याचे आश्वासन दिले. तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुका आपण शिंदे गट शिवसेना म्हणून लढणार असून मळेवाड जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीत भगवा फडकविण्यासाठी सर्वांनी तयारीला लागावे. “गावाच्या विकासासाठी जी काही मदत लागेल ती निश्चितच केली जाईल” असे ते म्हणाले.तसेच, पक्षविस्ताराच्या उद्देशाने यापुढे प्रत्येक आठवड्यात नियमितपणे पक्षप्रवेश आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यात मळेवाड सोसायटीचे चेअरमन प्रकाश पारसेकर, प्रकाश राऊळ, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मुळीक यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उत्साहाचे वातावरण निर्माण केले.कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
