साहित्यिका मेघना जोशी यांचे प्रतिपादन: भंडारी ए सो हायस्कूल येथे अभिजात मराठी भाषा दिन आणि अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा..
⚡मालवण ता.०८-:
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठीच्या विकासासाठी व प्रसारासाठी आर्थिक तरतुदीसह अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. मराठी भाषा अभिजात बनली म्हणजे नेमके काय झाले हे प्रत्येकाला माहित असणे गरजेचे असून त्याचा फायदा आपण कसा घेऊ शकतो किंवा मराठी भाषेसाठी आपण काय करू शकतो याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे असे प्रतिपादन मालवणच्या साहित्यिका आणि करिअर कॉन्सिल सेंटर मालवणच्या संचालिका सौ. मेघना जोशी यांनी येथे बोलताना केले.
मालवण येथील भंडारी ए सो हायस्कूल येथे अभिजात मराठी भाषा दिन आणि अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात आला यावेळी ग्रंथालय विभागाच्यावतीने अभिजात मराठी भाषा आणि आपण याविषयावर सौ मेघना जोशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते व्यासपीठावर मुख्याध्यापक एच बी तिवले, पर्यवेक्षक आर डी बनसोडे, सो संजना सारंग, सौ सरोज बांदेकर ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई आदी व इतर उपस्थित होते यावेळी सौ जोशी यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन केले प्रारंभी श्री प्रफुल्ल देसाई यांनी प्रास्ताविक केले तर श्री तिवले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले
यावेळी बोलताना मेघना जोशी म्हणाल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून यामुळे मराठी भाषेसाठी केंद्र शासनाकडून २५० ते ३०० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. याद्वारे अनेक आर्थिक तरतुदी केल्या जाणार आहेत. मराठी ग्रंथ व साहित्याचा यांचा प्रसार केला जाणार आहे. गुणवत्ता पूर्ण शिक्षणात मराठीचा समावेश होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना मराठीचा अभ्यास करण्यासाठी प्रत्येक विद्यापिठात स्वतंत्र केंद्र निर्माण होणार असून ग्रामीण व शहरी भाग मिळवून सुमारे ४५० केंद्र निर्माण होणार आहेत. तसेच मराठी भाषेतील दोन विद्वान किंवा साहित्यिकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळणार आहे. हे सर्व आपल्या भविष्यासाठी केले असल्याने मराठी भाषा अभिजात झाल्याने जे जे घडणार आहे किंवा मराठी साठी काय काय तरतुदी केल्या जाणार याची माहिती आपण घेतली पाहिजे.
त्या पुढे म्हणाल्या, आज मराठीमध्ये इतर भाषांचे शब्द समाविष्ट करून बोलले जाते, असे न करता आपली मातृभाषा आपल्या चांगल्या पद्धतीने बोलतात आली पाहिजे. आपल्याला अनेक भाषा आल्या पाहिजेत, ही उत्तम गोष्ट आहे. मात्र आपली मातृभाषा असलेल्या मराठीची लाज बाळगता कामा नये. जो माणूस मातृभाषेतून व्यक्त होऊ शकतो, चांगल्या रीतीने विचार करू शकतो तो माणूस आपोआपच इतर भाषांमध्येही चांगल्या पद्धतीने विचार करू शकतो व म्हणणे मांडू शकतो. आपली भाषा एकसंध बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे , इतर भाषा मिसळून मराठी बोलू नका, असेही सौ. जोशी म्हणाल्या. शेवटी आर डी बनसोडे यांनी आभार मानले
