सुधीर दळवी:जिल्हा बँकेची बदनामी स्वतःच्या स्वार्थासाठी करणे अत्यंत गैर..
⚡दोडामार्ग ता.०८-: माजी आमदार राजन तेली हेच फसवणुकीचे खरे सूत्रधार असून, नेहमी दुसऱ्यावर बोट दाखविण्यापूर्वी त्यांनी स्वतः किती जणांची फसवणूक केली आहे याचे आत्मपरीक्षण करावे, असा गंभीर आरोप भाजपचे जिल्हा चिटणीस सुधीर दळवी यांनी केला आहे.
श्री. दळवी यांनी स्पष्ट केले की, पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यावर आरोप करणे म्हणजे “उंटावरून शेळी हाकण्यासारखे” आहे. राजन तेली यांनी ज्या जिल्हा बँकेचे प्रतिनिधित्व केले, त्याच बँकेची बदनामी स्वतःच्या स्वार्थासाठी करणे अत्यंत गैर असल्याचे त्यांनी सांगितले. “फसवणूक करणे हा राजन तेली यांचा धंदा असून, खोट्या पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर खोटे आरोप करणे थांबवावे, अन्यथा आम्ही ती बदनामी सहन करणार नाही,” असेही दळवी म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, राजन तेली ज्या-ज्या पक्षात गेले, तिथे त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांची फसवणूक केली आहे. स्वार्थासाठी त्यांनी वारंवार पक्षांतर केले असून, स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांना देखील त्यांनी दिशाभूल केली आहे. “सिंधुदुर्ग बँक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची बँक आहे, त्यामुळे विनाकारण तिची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणे अयोग्य आहे,” असेही त्यांनी नमूद केले.‘त्या
पंधरा दिवसांचे काय?’
दळवी यांनी पुढे टोला लगावत म्हटले की, “पुराणातील कैकयीने श्रीरामांना १४ वर्षांच्या वनवासाला पाठविले होते. त्याचप्रमाणे, राजन तेली आमदार असताना त्यांनी ‘हे काम पंधरा दिवसात होईल’ असे सांगितले होते, परंतु आजतागायत ते काम झालेले नाही.”ते पुढे म्हणाले की, “राजन तेली हे नेहमी कार्यकर्त्यांशी खेळ करतात. त्यांना कोणाचेही सोयरसुतक नसते, त्यामुळे त्यांनी पालकमंत्र्यावर बोलू नये, आधी स्वतःकडे पाहावे,” असा उपरोधिक सल्ला त्यांनी दिला.
