कलमठ गावातील शासकीय कर्मचाऱ्यांना ‘एआय’ प्रशिक्षण…

⚡कणकवली ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा एआय (Artificial Intelligence) दिशेने वाटचाल करत असताना कलमठ ग्रामपंचायत वतीने गावातील विविध शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ‘एआय कार्यपद्धती’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

या प्रशिक्षणामध्ये आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणाचे मार्गदर्शन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी महेश चव्हाण यांनी केले.

या प्रशिक्षणाचा उद्देश कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे व त्यांच्या कामकाजात सुधारणा करणे हा होता. प्रशिक्षणादरम्यान एआय म्हणजे काय, त्याची कार्यपद्धती, फायदे, मर्यादा आणि शासकीय दैनंदिन कामकाजात त्याचा उपयोग कसा करता येईल याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.

उपस्थित कर्मचाऱ्यांनी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरल्याचे सांगत, एआयच्या मदतीने काम अधिक सुलभ व कार्यक्षमपणे पार पाडता येईल असा विश्वास व्यक्त केला.

या प्रसंगी सरपंच संदीप मेस्त्री यांच्या हस्ते प्रशिक्षक महेश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page