Headlines

दुष्काळसदृश परिस्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा…

नेमळेत शेताच्या बांधावर जाऊन पाहणी; ‘जलतारा’ उपक्रमाचा शुभारंभ..

⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी तालुक्यातील नेमळे ग्रामपंचायत हद्दीत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी गुरुवारी (दि. २५ सप्टेंबर) प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. पावसाअभावी भात पिकांवर होत असलेला परिणाम तसेच स्थानिक ओढ्यांमधील घटलेली पाणीपातळी याबाबत त्यांनी शेतकरी व ग्रामस्थांकडून माहिती घेतली.

दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी गावागावांत वनराई बंधारे तसेच कच्चे बंधारे तातडीने उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी प्रशासनाला दिले. पाण्याची उपलब्धता वाढविण्यासोबतच जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजनांवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ‘जलतारा’सारखे जलसंधारण प्रकल्प प्रभावी ठरू शकतात. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर अशा प्रकल्पांची कामे हाती घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी त्यांच्या हस्ते सावंतवाडी तालुक्यातील ‘जलतारा’ उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
या पाहणी दौऱ्यावेळी सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक, उपविभागीय अधिकारी वीरसिंग वसावे, गटविकास अधिकारी निलेश जाधव, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुदेश राणे यांच्यासह नेमळे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page