डॉ.अमर कांबळे:कट्टा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम संपन्न..
⚡मालवण ता.०३-:
बौद्ध धम्म हा एक महान आदर्शवादी धम्म आहे. माणसातील माणूसपण जपण्यासाठी धम्म आवश्यक आहे. त्याचबरोबर धम्म हा विज्ञाननिष्ठा, न्याय, प्रज्ञा, प्रेरणा यासाठी देखील आवश्यक आहे. म्हणूनच एक आदर्श जीवन जगण्यासाठी तरुणांनी ही धम्माची चळवळ पुढे गतिमान करणे काळाची गरज आहे आणि त्यासाठी नवीन तरुणाईला चळवळीची ओळख निर्माण करून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन प्राध्यापक डॉ. अमर कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बोलताना केले.
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व महिला शाखा मालवण यांच्यावतीने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन तालुकाध्यक्ष रविकांत कदम यांच्या अध्यक्षतेखाली व प्राध्यापक डॉ. अमर कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे संपन्न झाला. याप्रसंगी डॉ. अमर कांबळे हे बोलत होते.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणचे अध्यक्ष रविकांत कदम, डॉ. अमोल कांबळे,कोषाध्यक्ष सूर्यकांत कदम, सरचिटणीस प्रकाश पवार, जिल्हा महिला शाखेच्या संस्कार विभाग उपाध्यक्ष स्नेहा पेंडूरकर, जिल्हा महिला शाखेच्या संरक्षण विभाग उपाध्यक्ष प्रीतम जाधव, जिल्हा शाखेच्या महिला संघटक लीना तळगावकर, तालुका महिला शाखेच्या सरचिटणीस समता डिकवलकर, तालुका संस्कार विभाग उपाध्यक्ष नचिकेत पवार, तालुका प्रचार पर्यटन विभाग उपाध्यक्ष अमित पवार, तालुका संरक्षण विभाग उपाध्यक्ष भगवान जाधव, तालुका हिशोब तपासणीस शंकर कदम, माजी जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ मार्गदर्शक एम. आर. डांगमोडेकर, नामदेव जाधव, राजन कदम, सोमा कदम, आरपीआय जिल्हाध्यक्ष अजितकुमार कदम सर्व तालुका कार्यकारणी, महिला शाखा, गाव शाखा अध्यक्ष, उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुका अध्यक्ष रविकांत कदम आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, तालुका शाखा व महिला शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने जे कार्यक्रम आपण या भवनांमध्ये संपन्न करत आहोत त्या सर्वांमध्ये आपल्या सर्वांची एकजूट, सर्वांचं सहकार्य हे फार अनमोल आहे असेच सहकार्य भविष्यात अपेक्षित आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका शाखेचे कोषाध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी केले. तर सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस प्रकाश पवार यांनी केले. तालुका संस्कार विभाग उपाध्यक्ष नचिकेत पवार यांनी सर्व मान्यवर व उपस्थित यांचे आभार मानले आणि सरणतेय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
