आजच्या तरूणाईने वैचारिकदृष्टया सक्षम होणे ही आजच्या काळाची गरज…

डॉ. गोविंद काजरेकर:”राष्ट्रीय सेवा योजना दिना”चा कार्यक्रम संपन्न..

⚡बांदा ता.२९-: “आजची तरुणाई ही देशाच्या भवितव्यासाठी सजग, तत्पर आणि संवेदनशील असायला हवी. त्यासाठी आजच्या तरूणाईने वैचारिकदृष्टया सक्षम होणे ही आजच्या काळाची गरज आहे, आजची तरूणाई देशाच्या भवितव्याचा विचार करणारी अशी आहे आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय सेवा योजनेतून समाजाभिमुख विद्यार्थी घडू शकतात व त्याचे सामर्थ्य आजच्या शिक्षण व्यवस्थेत आहे. यासाठी तरुणांनी सजग, तत्पर व संवेदनशील राहून समाजसेवेचे व्रत अंगीकारावे तरच समाजाभिमुख नेतृत्व उदयाला येईल.” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी येथे केले.

येथील गोगटे-वाळके महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या “राष्ट्रीय सेवा योजना दिना”चे औचित्य साधून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ. काजरेकर हे एन.एस.एस. स्वयंसेवकांना संबोधित करीत होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत एन.एस.एस विभाग सदस्य प्रा.अभिजीत गटकुळ यांनी केले. कार्यक्रमाचे मुख्य प्रमुख वक्ते व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा. निरंजन आरोंदेकर हे आपल्या व्याख्यानात म्हणाले की, ” तरुणांना संस्कारशील, कार्यक्षम व संवेदनशील बनवण्यासाठी संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय सेवा योजना ही चळवळ राबवली जाते. तरुण पिढीमध्ये देशभावना, देश समर्पण व सेवा या वृत्ती अंगी बानवाण्यासाठी व त्यांनी सक्षम होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हा उपक्रम आहे. ही संकल्पना तरुणांनी आपल्या जीवनात अंमलात आणावी, या विभागातून दिले जाणारे शिक्षण भावी जीवनाला लाभदायक ठरेल “
यावेळी “आजची तरुणाई व बदलती नीतिमूल्ये ” या विषयावर स्वयंसेविका आकांक्षा सावंत हिने आपले विचार व्यक्त केले. तसेच महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्पर्धेचे परीक्षण प्रा. संपदा शिंदे व प्रा. अभिजीत गटकुळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.एस.एस. स्वयंसेविका वैष्णवी कांबळे यांनी केले तर आभार स्वयंसेवक अमोल सावंत यांनी मानले.
फोटो:-
बांदा येथील गोगटे वाळके महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. डॉ. गोविंद काजरेकर. सोबत इतर.

You cannot copy content of this page