⚡कणकवली ता.२८-:
शिवसेना आणि रिपब्लिकन सेना युतीनंतर आंबेडकरी चळवळीला नवी दिशा मिळाली असून कार्यकर्त्यांचा सत्तेतील सहभाग वाढण्याची आशा निर्माण झाली आहे. “आंबेडकरी कार्यकर्ते कायम रस्त्यावर लढत आले, पण सत्तेत त्यांना स्थान मिळाले नाही. आता शिवसेनेशी युती झाल्याने आम्ही सत्तेत सहभागी झालो असून आगामी सर्व निवडणुका एकत्रितपणे लढून उमेदवार विजयी करू,” असा विश्वास रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केला.
वैभववाडी येथील कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या आंबेडकर यांनी कणकवली शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ही भूमिका स्पष्ट केली. यावेळी रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष विनोद काळे, जिल्हा प्रवक्ते अनिल तांबे, संपर्कप्रमुख बाळकृष्ण जाधव आदी उपस्थित होते.
आंबेडकर म्हणाले, “१६ जुलैला झालेल्या या युतीमुळे आंबेडकरी चळवळ अधिक सक्षम झाली आहे. कार्यकर्त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याची जबाबदारी आमची असून रिपब्लिकन सेना ही आज आंबेडकरी चळवळीतील सर्वात मोठी ताकद ठरत आहे. युतीनंतर नवीन कार्यकर्त्यांचा ओघ वाढला आहे.”
अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या मुद्यावर त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला. “जातीनिहाय जनगणना न करता उपवर्गीकरण करणे चुकीचे आहे. ओबीसी ५२ टक्के, मराठा ३६ टक्के, एससी १३ टक्के, एसटी ६ टक्के, मुस्लिम सुमारे १५ टक्के असल्याचे सांगितले जाते. हे आकडे मिळून लोकसंख्येपेक्षा अधिक होतात. त्यामुळे नोकरी–शिक्षणासह सत्तेतही उपवर्गीकरण करावे, अन्यथा या निर्णयाचा निषेध राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
