⚡मालवण ता.२६-:
मालवणी भाषेतील ज्येष्ठ कवी रुजारिओ पास्कल पिंटो यांना मानाचा राजधानी पुरस्कार जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप असून या पुरस्काराचे वितरण कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते मालगुंड येथे ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
नव्या युगाचे आद्य कवी केशवसुत उर्फ कृष्णाजी केशव दामले यांचे मालगुंड (जि. रत्नागिरी) हे जन्मस्थळ. त्या जन्मस्थळाला आधुनिक कवींची राजधानी, असे ज्ञानपीठप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांनी म्हटले होते. म्हणून त्या पुरस्काराचे नामकरण ‘राजधानी पुरस्कार’ असे पडले आहे. यापूर्वी हा मानाचा पुरस्कार कवी अशोक नायगावकर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, डा. महेश केळुसकर, कवी सौमित्र, प्रा. निरजा आदी अनेक मान्यवर कवींना प्राप्त झालेला आहे. आता रुजारिओ पिंटो यांच्या रूपाने अस्सल मालवणी बोलीच्या, खुमासदार कवीला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
रुजारिओ पिंटो हे मराठी, कोकणी, मालवणी आणि हिंदी या चार भाषांमध्ये कविता साकारणारे एकमेव कवी असून ‘माऊली, दयदिगेर’ (कोकणी), ‘आम्ही मालवणी, गरो फणसाचो’ (मालवणी) हे त्यांचे कवितासंग्रह असून ‘बूमरँग’ हा त्यांचा कथासंग्रह बराच गाजलेला आहे. त्यांच्या कवितांचा समावेश मुंबई विद्यापीठाच्या एसवाय बीएच्या अभ्यासक्रमात झाला आहे. तसेच गोवा राज्याच्या पाठ्यपुस्तकात त्यांच्या कवितेचा समावेश आहे. महाराष्ट्र, गोवा आदी भागात त्यांचे काव्यवाचनाचे कार्यक्रम सातत्यपूर्ण होत असतात. राष्ट्रीय साहित्य अकादमी, नवी दिल्ली-कोकणी समितीवर ते सदस्य आहेत. अखिल भारतीय कोकणी साहित्य परिषदेचे ते सदस्य आहेत. ‘आम्ही मालवणी’ आणि ‘माझा कोकण’ या त्यांच्या कवितासंग्रहाच्या सीडीज् मालवणी प्रांतात प्रसिद्ध आहेत. गेली ३० वर्षे ते कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विविध पदांवर कार्यरत आहेत. राजधानी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
