वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला ब्रेक लावण्यासाठी न प चा उपक्रम
*💫मालवण दि.०७-:* मालवण शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून शहरातील कोरोनाबाधित रुग्ण संख्या वेगाने वाढल्याने नगरपालिका प्रशासन सतर्क बनले आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने माझे मालवण माझी जबाबदारी ही मोहीम नगरपालिकेने हाती घेतली असून गुगल फॉर्म द्वारे ऑनलाइन पद्धतीने शहरात परगावातून आलेल्या व्यक्तींची व कोरोना सदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची माहिती प्रशासनाकडून गोळा करण्यात येत आहे. या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे. मालवण शहरात कोरोना रुग्ण संख्या अलीकडच्या काही दिवसात वेगाने वाढत असल्याने या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. सकाळी ११ वाजल्यानंतर दुकाने सुरू ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई तसेच संचारबंदी काळात विनाकारण फिरणाऱ्या व विना मास्क व्यक्तींवर कारवाई नगरपालिकेकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्याच्या दृष्टीने ‘माझे मालवण माझी जबाबदारी’ ही मोहीम नगरपालिकेने हाती घेतली आहे. यामध्ये नगरपालिकेने गुगल फॉर्म तयार केला असून याद्वारे नागरिकांनी आपल्या परिसरात परगावाहून आलेली व्यक्ती व कोविड सदृश्य लक्षणे असणारी व्यक्ती याची माहिती भरावयाची आहे. यामध्ये माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुपित ठेवण्यात येणार आहे. तसेच खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास साथरोग कायदा १८९७ अंतर्गत कारवाई करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. या गुगल फॉर्म ची लिंक https://forms.gle/MYLAAp2AZDHgCePv8 अशी असून त्याद्वारे नागरिकांनी प्रशासनाला माहिती द्यावी आणि मालवण कोरोना मुक्त करण्यासाठी सहकार्य तसेच कोरोना विषयक माहितीसाठी 18002334381 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी श्री. जिरगे यांनी केले आहे.
