Headlines

ओबीसी समाजाचे कुडाळमध्ये लाक्षणिक उपोषण आणि इशारा आंदोलन…

नागपूर येथील प्रस्तावित मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन:जिल्ह्यातले विविध ३२ ओबीसी समाज आंदोलनात सहभागी..

⚡कुडाळ ता.२३-: ओबीसी समाजाच्या नागपूर येथे २८ तारखेला निघणाऱ्या ओबीसी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाच्या वतीने आज कुडाळ येथे लाक्षणिक उपोषण आणि इशारा आंदोलनांला सुरुवात झाली. दोन दिवस चालणाऱ्या या लाक्षणिक आंदोलनाची सुरुवात कुडाळ येथील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या आंदोलनातून “हैदराबाद गॅझेट” रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातले विविध ३२ ओबीसी समाज सहभागी झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने हे आंदोलन कुडाळ-जिजामाता चौकात छेडण्यात आले आहे. याचा शुभारंभ राजमाता जिजाऊ यांना वंदन करून करण्यात आला. त्यांनतर आंदोलन स्थळी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना देखील अभिवादन करण्यात आले. यावेळी ओबीसी आंदोलनाबाबत घोषणा देखील देण्यात आल्या.
आमचा कोणालाही आरक्षण द्यायला विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे पण ते ओबीसी कोट्यातून नको अशी आपली भूमिका असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाचे सिंधुदुर्गचे अध्यक्ष नितीन वाळके यांनी सांगितले. बिहारच्या धर्तीवर जशी जात गणना करण्यात येत आहे तशी जात गणना देशपातळीवर व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाला माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भेट दिली.
या आंदोलनात नितीन वाळके, नंदन वेंगुर्लेकर, काका कुडाळकर, सुनील भोगटे, अतुल बंगे, रमण वायंगणकर, एकनाथ तेली. श्री. भालेकर, राजन नाईक, आनंद मेस्त्री, कृष्णा तेली, समिल जळवी, किरण शिंदे, राजू गवंडे, श्रेया गवंडे, वर्षा कुडाळकर, निलेश तेंडुलकर आदी ओबीसी बांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page