कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि महान गावाचे ग्रामदैवत गांगेश्वर यांचा गुरुवारी भेट सोहळा…

⚡मालवण ता.१६-:
कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व महान गावाचे ग्रामदैवत श्री देव गांगेश्वर या देवतांचा वार्षिक पारंपरिक भेट सोहळा १८ सप्टेंबर रोजी महान गावी होणार आहे. यावेळी रयतेच्या रक्षण, रखवालीसाठी श्री देव गांगेश्वर देवालयातून दिले जाणारे राखणीचे श्रीफळ राणे-परब बारापाच मानकरी यांच्याजवळ देण्यात येणार आहे. या देवतांच्या भेट सोहळ्यादरम्यान भाविकांची महान गावी गर्दी होणार आहे.

गुरुवारी सकाळी कांदळगाव श्री देव रामेश्वर देवस्थानचे राणे परब मानकरी श्री रामेश्वर देवालयात जमून गाऱ्हाणे करून झाल्यावर कांदळगाव माळरानावरून जुन्या पारंपरिक वाटेने रयत सवाद्य लवाजम्यासमवेत महान या गावी येणार आहेत. १८ रोजी सकाळी महानचे ग्रामदैवत श्री देव गांगेश्वर देवाची विधिवत पूजा, अभिषेक, रक्षण रखवालीच्या श्रीफळाचे पूजन, महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर गांगेश्वर देवाला कौल प्रसाद लावून रक्षण रखवालीचे श्रीफळ परब मानकरी यांच्याजवळ देण्यात येणार आहे. श्रीफळ घेऊन समस्त राणे-परब बारापाच मानकरी सवाद्य माळरानावरून कांदळगाव येथे येणार आहेत. नवरात्री उत्सवात येथील श्री सातेरी देवी मंदिरात हे रखवालीचे श्रीफळ ठेवण्यात येणार आहे. नऊ दिवस याठिकाणी भजन, पूजन, जागर होणार आहे. दसरा उत्सवादिवशी हे रखवालीचे श्रीफळ बारापाच मांडावर आणण्यात येणार आहे. यावेळी कांदळगाव रामेश्वर देवस्थानचे राणे-परब बारापाच मानकरी व महान श्री देव गांगेश्वर देवस्थानचे बारापाच मानकरी उपस्थित राहणार आहेत.

You cannot copy content of this page