10 लाख 92 हजार 800 रुपयाचा मुद्देमाल जप्त:चार सशयितांना घेतले ताब्यात..
⚡कुडाळ ता.११-: मुंबई- गोवा महामार्गावर झाराप झिरो पॉईंट येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखे ( सिंधुदुर्ग ) च्या पथकाने गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या दोन कार पकडल्या. यात 8 लाख रुपये किमतीच्या हुंडाई आय ट्वेन्टी कार व मारुती स्विफ्ट कार तसेच 2 लाख 92 हजार 800 रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू मिळून एकूण 10 लाख 92 हजार 800 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही धडक कारवाई गुरुवारी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी दोन्ही कार जप्त करण्यात आल्या असून चार सशयिताना ताब्यात घेत अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे हवालदार विल्सन झुजे डिसोझा यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. नासिर इक्बाल राजगुरु (40, रा.सावंतवाडी – सालईवाडा ), अनंत अरुण मेस्त्री ( 33, रा.सावंतवाडी खासकीलवाडा ), शांताराम विष्णू कावले ( 48, रा. सावंतवाडी – माठेवाडा ) व ओंकार इंद्रजित सावंत ( 27, रा. ओरोस ) अशी या चार सशयितांची नावे आहेत.स्थानिक गुन्हा शाखेचे उपनिरीक्षक हनुमंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी उपविभागात पेट्रोलिंग सुरु होते. मुबंई – गोवा महामार्गावरून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती या शाखेला मिळाली. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सूचनेनुसार पेट्रोलिंग करणाऱ्या या शाखेच्या पथकातील उपनिरीक्षक श्री भोसले यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड,पोलीस हवालदार प्रकाश कदम, विल्सन डिसोझा, आशिष जामदार, महेश्वर समजीसकर यांनी मुबंई गोवा महामार्गावर झाराप झिरो पॉईंट येथे आज पहाटेच्या सुमारास सापळा रचला.पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास गोव्याहून ओरोस – कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या हुंडाई आय ट्वेन्टी व मारुती स्विफ्ट या दोन कार थांबविल्या. त्या कारची तपासणी केली असता दोन्ही कारमध्ये गोवा बनावटीची दारू सापडली. तसेच कार मधील नासिर राजगुरु , अनंत मेस्त्री व शांताराम कावले ( सर्व रा. सावंतवाडी ) या तिघांना ताब्यात घेतले. दोन कार व गोवा बनावटीची दारू मिळून 10 लाख 92 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच ओंकार सावंत ( रा. ओरोस ) याच्या सांगण्यावरून सदर दारू पत्रादेवी – गोवा येथून ओरोस येथे घेऊन जात असल्याचे संशयितांनी चौकशी दरम्यान सांगितले. त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ओंकार सावंत याला ओरोस येथून ताब्यात घेतले. सदर चारही आरोपींसह मुद्देमाल कुडाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.