जिल्हाप्रमूख संदेश पारकर:ठाकरे शिवसेनेची कणकवली प्रांताधिका-यांमार्फत सरकारकडे मागणी,सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी..
कणकवली : महायुती सरकारने महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा” लागू करणार असल्याची तरतूद विधिमंडळात करण्यात आली आहे. या कायद्याविरोधात संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हा जनविरोधी, घटनाविरोधी, लोकशाही चा हक्क नाकारणारा जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन कणकवलीत जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आले.
यावेळी आवाज कुणाचा शिवसेनेचा … पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा विजय असो… युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा विजय असो… झालाच पाहिजे झालाच पाहिजे … जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे … अशा जोरदार घोषणा ठाकरे शिवसेनेच्यावतीने कणकवली प्रांतकार्यालयाबाहेर देत सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, देवगड तालुका प्रमुख रवींद्र जोगल, जयेश नर, अल्पसंख्यांख जिल्हा अद्यक्ष मज्जीद बटवाले, राजू शेट्ये, राजू राणे, विलास गुडेकर, देवगड उपतालुका प्रमुख दादा सावंत, खुडी सरपंच दीपक कदम, युवासेना तालुका समन्व्यक तेजस राणे, सिद्धेश राणे, वैभव मालंडकर, सी. आर चव्हाण, अजय जाधव, किरण वर्दम, अजित काणेकर, मंगेश राणे, रिमेश चव्हाण, पराग म्हापसेकर, संजय सावंत, मंगेश फाटक, वीरेंद्र नाईक, समीर परब, महिला उपजिल्हाप्रमुख प्रतीक्षा साटम, महिला तालुका संघटक वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, माधवी दळवी आदी शिवसैनिक उपस्थित होते.
जनसुरक्षा कायद्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला जी सरकारच्या मते तो सार्वजनिक सुव्यवस्थेस किंवा राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरत असेल तर त्या व्यक्तीला कोणतेही आरोप न नोंदवता तात्काळ ताब्यात घेण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. तसेच एखाद्या संघटनेला बेकायदेशीर संघटना जाहीर करता येणार आहे, तसेच त्या संघटनेचे कार्यालय, परिसर व इतर संपत्ती जप्त करण्यात येईल. बंदी घातलेल्या संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते नव्या नावाने संघटना उभारून तेच कार्य करत असतील तर नवी उभारलेली संघटना ही मुळ बेकायदेशीर संघटनेचा भाग मानली जाईल. ती संघटना देखील बेकायदेशीर ठरेल. डीआयजी रॅकच्या अधिकाराच्या परवानगीनेच गुन्हे दाखल करता येतील अशी या कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. यामुळे जनविरोधी, घटनेविरोधी, लोकशाही नाकारणारा जनसुरक्षा कायदा रद्द करा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदेश पारकर यांनी कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना निवेदन देत केली आहे.