⚡सावंतवाडी ता.०६-: राहटा-अहिल्यानगर येथे २७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान आयोजित सीबीएसई झोनल क्रिकेट निवड चाचणी स्पर्धेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा मान उंचावला आहे. स्पर्धेत दहावीतील पलाश प्रितम वाडेकर व आठवीतील संकेत राजेंद्र राणे यांनी सुवर्णपदक पटकावत राष्ट्रीय संघात स्थान निश्चित केले आहे._
निवड चाचणीत १४, १७ आणि १९ वर्षाखालील वयोगटातील एकूण १०३६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पहिल्या फेरीत १४ वर्षाखालील ८८, १७ वर्षाखालील ८५ व १९ वर्षाखालील ३४ खेळाडूंची निवड करण्यात आली. अंतिम फेरीत प्रत्येक वयोगटातून सुवर्णपदकासाठी १८ व रौप्य पदकासाठी १४ खेळाडूंची नावे निश्चित करण्यात आली. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंमध्ये पलाश वाडेकर व संकेत राणे यांचा समावेश असून नवी दिल्ली येथे १५ ते २० सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत साऊथ झोन – सदर्न स्ट्रायकर्स या संघातून ते खेळतील.
याच स्पर्धेत शाळेतील गौरव आनंद वारंग व अधिश दीपक गावडे यांनी रौप्य पदक पटकावून आपली छाप पाडली. सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक सचिन हरमलकर व एस्तर परेरा यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक अच्युत सावंत भोसले, मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.