⚡मालवण ता.०५-:
जिल्ह्याच्या समुद्रात परप्रांतीय हायस्पीड मासेमारी नौकांचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत असल्याबाबत पारंपारिक मच्छिमारांकडून सातत्याने आवाज उठविला जात असताना या हायस्पीड नौकांची समुद्रातील दादागिरी दर्शविणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सुमारे सात ते आठ हायस्पीड नौका दिसत असून पारंपारिक मच्छिमारानी समुद्रात टाकलेल्या जाळीवरून हायस्पीड नौका नेऊ नये अशी विनंती पारंपारिक मच्छिमार हायस्पीड नौकेतील मच्छिमारांना असतानाही ते जुमानत नसल्याचे व्हिडिओत दिसत आहे. कुठे राहिले मत्स्य विभागाचे ड्रोन, कुठे राहिली गस्तीनौका असा सवाल मच्छिमारांनी करत मत्स्य व्यवसाय विभागाच्या कारभारावर या व्हिडीओतून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय मंत्री नीतेश राणे यांनीही मत्स्य व्यवसाय विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले असतानाही हायस्पीड बोटीचे अतिक्रमण कमी होताना दिसत नसल्याचे मच्छीमारांनी टाकलेल्या व्हिडिओतून समोर आले आहे. हायस्पीड बोटीच्या अतिक्रमणाचा हा व्हीडिओ शेअर करून पारंपारिक मच्छिमार शासनाविरोधात आपला रोष व्यक्त करत आहेत. पारंपारिक मच्छीमारांनी टाकलेल्या जाळ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी पारंपारिक मच्छिमारांनी आपली नौका थेट हायस्पीड नौके समोर नेऊन हायस्पीड नौका बाजूला नेण्याची सूचना त्यातील मच्छिमारांना करूनही नौका बाजूला गेल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांना आपल्या बोटी आणि जाळी बाजूला कराव्या लागल्या होत्या. अशामुळे संतप्त झालेल्या मच्छिमारांनी एक व्हिडिओ बनवून किती प्रमाणात हायस्पीड नौका सिंधुदुर्गाच्या दहा ने अकरा वाव समुद्रात मासेमारी करत आहेत, हे दाखवून दिले आहे. मच्छीमारांनी भावना व्यक्त करताना ड्रोन कैमेरा आणि हायस्पीड गस्तीनौका कुठे आहेत? आम्ही समुद्रात संघर्ष करत असताना शासन कुठे आहे, असा सवाल उपस्थित केला आहे.