⚡मालवण ता.०५-:
मालवण तालुक्यातील श्रावण येथे आज पहाटे ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास श्रावण येथील लोकवस्तीच्या ठिकाणी रस्त्यावर संचार करताना हा बिबट्या दिसून आल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.
मालवण तालुक्यातील काही भागांमध्ये बिबट्यांचा संचार सुरु असताना श्रावण गावातही बिबट्याचा संचार सुरु असल्याचे समोर आले आहे. श्रावण येथील मुख्य रस्त्यावर आज पहाटे पावणे पाच वाजता बिबट्या फिरताना दिसून आला. लोकवस्ती असलेल्या या भागातील कुबल सुपर मार्ट समोरील रस्त्यावर हा बिबट्या फेऱ्या मारत असल्याचे दिसून आले. यावेळी मनस्वी विनोद कुबल यांनी आपल्या घरातून मोबाईल कॅमेऱ्यात या बिबट्याचे दृश्य कैद केले आहे. लोकवस्तीच्या ठिकाणी बिबट्या मुक्त संचार करत असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत असून वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.