⚡मालवण ता.०४-:
मालवण – बेळणे मार्गावरील महान येथील श्री गांगेश्वर मंदिर नजीकचे मोठे वडाचे झाड कोसळल्याची घटना आज सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. ग्रामस्थांच्या मदतीने हे झाड हटविण्यात आले.
महान येथे वडाचे झाड कोसळल्याने त्याच्या फ़ांद्या रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील संदीप शिंदे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने रस्त्यावर पडलेल्या झाडाच्या फांद्या बाजूला करून वाहतूक जाण्यासाठीचा मार्ग मोकळा करून दिला. त्यानंतर बांधकाम विभागाचे गावित यांनी घटनास्थळी पोहचून जेसीबीच्या सह्यायाने उर्वरित झाड रस्त्याच्या बाजूला केले.
महान गावामध्ये अजूनही रस्त्याच्या कडेला असलेली अनेक झाडे धोकादायक बनली असून ती कोसळून जीवितहानी होऊ शकते. तसेच प्राथमिक शाळा, महान या शाळेला लागून असलेले वडाचे झाड धोकादायक स्थितीत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.
