कुडाळमध्ये ७,८ व ९ नोव्हेंबर ला कुडाळदेशकर प्रीमियम लीग…

कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे आयोजन:सिंधुदुर्गचे अध्यक्ष रणजित देसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती..

कुडाळ : गौड ब्राह्मण सभा गिरगाव मुंबई संकल्पित व कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या वतीने दि. ७, ८ आणि ९ नोव्हेम्बर २०२५ रोजी दहाव्या केपीएल अर्थात कुडाळदेशकर प्रीमियर लीग या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील कुडाळ हायस्कूल मैदान आणि बॅ.नाथ पै शिक्षण संस्था एमआयडीसी येथे हा महोत्सव होणार आहे. यात विविध क्रीडा स्पर्धांसह कला दालन – प्रदर्शन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. अशी माहीती कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष रणजीत देसाई व केपीएलचे क्रीडा संघटक मनीष दाभोलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुडाळ एमआयडीसीतील बॅ.नाथ पै शैक्षणिक संकुल येथे सोमवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत श्री.देसाई बोलत होते. यावेळी मनिष दाभोलकर, उमेश गाळवणकर, केदार सामंत, प्रशांत धोंड, राजन नाईक, प्रफुल्ल वालावलकर, गुरू देसाई, रोहन देसाई, अतुल सामंत, प्रदीप नेरूरकर, तृप्ती प्रभुदेसाई, अमित तेंडोलकर, प्रसाद नाईक, अभय वालावलकर, प्रथमेश नाईक, स्वानंद सामंत, सुहास खानोलकर, डाॅ.प्रणव प्रभू, गौरव प्रभू आदींसह कोअर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
देसाई म्हणाले, गौड ब्राह्मण सभा मुंबई यांच्या संकल्पनेतून गेली नऊ वर्षे देशातील विविध भागांमध्ये कुडाळ देशकर जातीबांधवासाठी विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. गोरेगाव, पनवेल, कुडाळ, गोवा, डोंबिवली, कुडाळ, रत्नागिरी, मंगलोर व पुणे येथे आज पर्यंत केपीएलचे नऊ महोत्सव पार पडले आहेत. यावर्षी होणारा महोत्सव हा दहावा असून त्याचे आयोजन अत्यंत दिमाखात करण्यात येणार आहे. क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्ञातीबांधवांनी एकत्रित येऊन ज्ञातीच्या वृद्धीसाठी व त्या‌द्वारे समाजाच्या विकास व्हावा याकरिता अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व अन्य राज्यातील सुमारे २७ ज्ञाती संस्थांच्या सहकार्यातून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येते. या अगोदर देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याने दोन वेळा यजमानपद स्वीकारून महोत्सवाचे दिमाखाने आयोजन केले होते. यंदा पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या सपूर्ण कार्यक्रमाची आयोजनाची जबाबदारी ही सिंधुदुर्ग संस्थेने स्वीकारलेली आहे. या महोत्सवामध्ये पुरुष व महिलांसाठी क्रिकेट, बॅटमिटन, बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा तसेच दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. कुडाळ हायस्कूलचे मैदान आणि तहसीलदार कार्यालय नजिकच्या मैदानावर क्रीडा स्पर्धा होणार आहेत तर एमआयडीसीतील बॅ.नाथ पै शैक्षणिक संकुल येथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. याचबरोबर ज्ञातीमधील विविध क्षेत्रातील कलाकारांचे कलादालन उभारण्यात येणार असून यामध्ये सुमारे १०० पेक्षा अधिक कलाकार आपल्या विविध कलाकृतींची मांडणी करणार आहेत. हा महोत्सव निश्चितच यादगार ठरणार आहे.
गेल्या वर्षी पुणे येथे पार पडलेल्या केपीएल च्या नवव्या पर्वात सुमारे २ हजार पेक्षा जास्त स्पर्धक व ज्ञाती बांधवांनी सहभाग घेतला होता. सिंधुदुर्गासह महाराष्ट्र तसेच भारतभरातून यावर्षी सुमारे ५ हजार जातीबांधव या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत, तसे नियोजन सुरू करण्यात आले आहे. या स्पर्धेतील नोंदणी करता ऑनलाइन अॅप करण्यात आले असून या लिंकचे उ‌द्घाटन करून रणजित देसाई यांच्या नोंदणीने नोंदणीचा शुभारंभ बॅरिस्टर नाथ शैक्षणिक संकुल कुडाळ येथे पार पडला.
यावर्षी स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफीज व मेडल्स देण्यात येणार आहेत. त्या पूर्णपणे नैसर्गिक वस्तूंपासून व पर्यावरण पूरक करण्यात येणार आहेत. या स्पर्धेच्या उ‌द्घाटनाला कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण ज्ञातीमधील राजकीय, सामाजिक, व्यवसाय, साहित्य, क्रीडा व उ‌द्योग विश्वातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच या महोत्सवाच्या निमित्ताने केपीएलचा अश्वमेध या नावाने स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार असून यामध्ये गेल्या दहा वर्षातील केपीएल चा प्रवास व घोडदौड याबद्दल विस्तृतपणे माहिती संकलित करून प्रकाशित करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे नियोजन हे मार्च महिन्यापासूनच सुरु झालेले असून कुडाळदेशकर जातीमधील तरुण हे ज्येष्ठ जातीबांधवांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव यशस्वी करण्याकरीता नियोजन करत आहेत, असे यावेळी श्री.देसाई आणि श्री.दाभोलकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page