गणेशोत्सवापूर्वी वेतन देण्याची मनसेची जि. प. सीईओंकडे मागणी:सोमवारपर्यंत वेतन जमा करण्याचे सीईओंचे आश्वासन..
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर गेल्या सहा महिन्यांपासून वेतना विना आहेत. त्यांचे वेतन गणेशोत्सवा पुर्वी वितरित करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन केली आहे. दरम्यान मुख्याधिकाऱ्यांकडून येत्या सोमवारपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा करण्याचे आश्वासन मनसे शिष्टमंडळाला दिले असल्याची माहिती मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिली.
याबाबत कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, डिजिटल इंडियाच्या नावाखाली सिंधुदुर्गातील सर्व ग्रामपंचायत मध्ये ऑनलाइन काम करिता डाटा ऑपरेटर नियुक्त करण्यात आले. यामध्ये बहुतांशी गावातीलच बेरोजगार युवक युवती हे डाटा ऑपरेटर म्हणून ग्रामपंचायतीमध्ये कामास लागले. परंतु या डाटा ऑपरेटर कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी शासनाने अत्यंत किचकट प्रक्रिया बनवली. यामध्ये ग्रामपंचायतने आपल्या फंडामधून आगाऊ रक्कम १२ हजार रुपये महिना प्रमाणे शासनाने नेमून दिलेल्या कंपनीच्या खात्यावर जमा करावी. त्यानंतर कंपनीचा ठेकेदार या ग्रामपंचायतीच्या डाटा ऑपरेटर कर्मचाऱ्यांना आठ हजार महिना प्रमाणे वेतन देण्याचे शासनाने ठरवले.
परंतु बऱ्याचदा ग्रामपंचायतीने अगाऊ रक्कम भरुनसुद्धा कंपनीमार्फत या डाटा ऑपरेटरना अनेक महिने पगार विना रहावे लागते आहे. आता तर अवघ्या चार ते पाच दिवसांवर गणेशोत्सव आला असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास ४०० ते ५०० डाटा ऑपरेटर गेल्या सात महिन्यापासून पगारापासून वंचित आहेत. याकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्या परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत लेखी निवेदन देत तात्काळ पगार वितरित करून या डाटा ऑपरेटर यांची गणेश चतुर्थी गोड करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब,उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, उपतालुकाध्यक्ष गजानन राऊळ व जगन्नाथ गावडे, विभाग अध्यक्ष अविनाश अणावकर, शाखाध्यक्ष पुजारे, विजय जांभळे आदी उपस्थित होते.