आतापर्यंत ५.६८ लाखाचा मुद्देमाल केला जप्त ; २४ जणांवर गुन्हे:जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी दिली माहिती..
कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अलीकडेच केलेल्या आंदोलनानंतर आतापर्यंत उत्पादन शुल्क विभागाने चौविस जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, एक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत पाच लाख,अडसष्ठ हजार ,तिनशे विस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आणि सात जणांविरुद्ध प्रतिबंधक कारवाईसाठी प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
मनसे कडून फेब्रुवारी २०२५ मध्ये निवेदन देऊन अवैध दारू विक्री व वाहतुकी बाबत कारवाईची मागणी करण्यात आली होती. परंतु पाच ते सहा महिन्यानंतर कारवाई न झाल्याने मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुका अध्यक्ष हेमंत जाधव, उप तालुकाध्यक्ष गजानन राणे, जगन्नाथ गावडे यांच्या सह कार्यकर्त्यांनी दारुनी भरलेल्या बाटल्याचा हार निरीक्षक उत्पादन शुल्क अधिकारी यांच्या गळ्यात घालून आंदोलन केले होते. त्या नंतर खडबडून जागे झालेल्या उत्पादन शुल्क कुडाळ विभागाची कारवाई जोरात सुरू असून मनसे याबाबत सातत्याने पाठपुरावा करीत आहे. अवैद्य दारू विक्री व वाहतूक करणाऱ्या माफीयांचे मात्र यामुळे धाबे दणानलेले आहेत, अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी दिली.