⚡वेंगुर्ला ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी बागायतदार व्यापारी यावर्षीच्या सुमारे 10 टक्के इतक्या अल्प उत्पादनामुळे आर्थिकदृष्ट्या संकटात आहे. याबाबत बुधवारी वेंगुर्ला येथे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह बागायतदार यांची बैठक संपन्न झाली होती. त्यानुसार
आंबा बागायतदार शेतकरी – व्यापारी यांनी आज गुरुवारी कणकवली येथे पालकमंत्री ना. नितेश राणे यांची भेट घेत वस्तुस्थिती व कैफियत मांडली. याबाबत झालेल्या विस्तृत चर्चेअंती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकरी यांची उद्या शुक्रवारी (20 फेब्रुवारी ) दुपारी 12.30 वाजता मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार,मंत्री ना. नितेश राणे आदी उपस्थित असणार आहेत. शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची सध्याची नैसर्गिक वातावरणामुळे झालेली बिकट अवस्था पाहता याबाबत नुकसानभरपाई मिळणे क्रमप्राप्त आहे. याबाबत उद्या होणाऱ्या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी त्वरित पावले उचलून ना. नितेश राणे यांच्याकडे पाठपुरावा केला. आज झालेल्या बैठकीत भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष पप्पू परब, सिंधुदुर्ग आंबा बागायतदार संघटना जिल्हाध्यक्ष जयप्रकाश चमणकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर, दाजी परब, संदेश निकम, प्रीतम सावंत, चंद्रशेखर देसाई, म्हापण पं. स. सदस्य विष्णू फणसेकर, जनार्दन पडवळ, प्रणव नाडकर्णी, छत्रपती शिवाजी महाराज संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर राय, नाथा मांजरेकर, ऍड. प्रकाश बोवलेकर, शैलेश धुरी, श्री. केळजी, आनंद गावडे आदिसह जिल्ह्यातील 50-60 बागायतदार शेतकरी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग आंबा बागायतदार शेतकरी शिष्टमंडळ यांची उद्या मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक…
