⚡सावंतवाडी ता.१८-: गेळे गावातील ग्रामस्थांना महाराष्ट्र शासनाच्या २७८ हेक्टर जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. या वाटपाचे आदेश १५ ऑगस्ट रोजी २८७ पैकी १६८ कुटुंबांना प्राप्त झाले आहेत. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जमिनीच्या प्रश्नाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. या महत्त्वपूर्ण वाटपाबद्दल गेळे ग्रामस्थांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाटपामुळे १६८ कुटुंबांना त्यांच्या हक्काचे ७/१२ उतारे मिळणार आहेत. या कामासाठी चव्हाण यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी गेळे गावामध्ये त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
या वाटपाव्यतिरिक्त, गावातील खासगी वने म्हणून घोषित असलेल्या ३६४ हेक्टर जमिनीचा प्रश्नही चव्हाण यांच्या माध्यमातून लवकरच मार्गी लागेल, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
हे निवेदन प्रसिद्ध करण्यासाठी आनंद व. गावडे, नितीन तु. गावस, गोपाळ क. परब, नारायण लाड, मनोहर ग. गावडे, अंकुश रा. गवस, विजय बा. गवस आणि राजाराम वा. बंड यांनी पुढाकार घेतला आहे.
