देवगड समुद्रकिनाऱ्यावर आढळला शिर नसलेला मृतदेह…

⚡देवगड ता.१६-: येथील फणसे समुद्रकिनाऱ्यावर शिर नसलेला मृतदेह आढळून आला आहे. ही घटना आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. नेमका हा मृतदेह कोणाचा? त्याचे शीर कसे काय गायब झाले? यावरून उलट-सुलट चर्चेला उधाण आले असून अपघात की घातपात? याबाबत प्रश्नचिन्ह व्यक्त होत आहे. या प्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . याबाबत अधिक माहिती अशी की, देवगड-फणसे समुद्रकिनाऱ्यावर आज सकाळी फिरणाऱ्या काही स्थानिकांना समुद्राच्या पाण्यात शिर नसलेला मृतदेह दिसून आला. त्या मृतदेहाच्या अंगावर आकाशी रंगाचा टी-शर्ट, क्रीम रंगाची हाफ पॅन्ट असा पेहराव आहे. मात्र त्या मृतदेहाला डोके नसल्यामुळे त्याची ओळख पटणे शक्य झाले नाही. याबाबतची माहिती त्यांनी देवगड पोलिसांना दिली. त्यानंतर देवगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक भरत धुमाळ यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन त्या मृतदेहाचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला आहे. यावेळी आशिष कदम, भाऊ नाटेकर आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान हा मृतदेह कोणाचा? त्याचे शीर कसे काय तुटले? याबाबत उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आता तो मृतदेह नेमका कोणाचा? याचा शोध लावणे देवगड पोलिसांसमोर आव्हान आहे.

You cannot copy content of this page