महसूलमंत्री बावनकुळे यांची माहिती..
ओरोस ता १३
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमिनींचा सामाईक सातबारा हा प्रश्न जटिल आहे. त्यामुळे कोकणातील शासकीय अथवा खाजगी जमिनींची पुन्हा मोजणी करणे काळाची गरज बनली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यासाठी खास अभियान राबविण्यात येणार आहे. यामधून आकारीपड, देवस्थान इनाम, वनसंज्ञा, कबुलायातदार यांसह अन्य शासकीय जमिनींचा प्रश्न सोडविला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
जिल्हा दौऱ्यावर असलेल्या महसूलमंत्री बावनकुळे यांनी बुधवारी दुपारी जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आ दीपक केसरकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, रणजित देसाई यांच्यासह भाजप पदाधिकारी, विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
