कुडाळ : कुडाळ-पिंगुळी-पाट मार्गावर माड्याचीवाडी-करमळगाळू येथील एसटी बस थांब्या नजीक कुडाळहून परुळेच्या दिशेने जाणाऱ्या एका इर्टिगा कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला आहे.
कार आपली दिशा सोडून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला गटारात जात घळणीला घासत निसाला धडक देत पलटी झाली. कारने तीन कोलंट्या घेतल्या असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
ही धडक एवढी जबरदस्त होती की कारचालकासोबत बसलेला कारमधील रोहन उर्फ अक्षय आत्माराम सावंत (18, रा. परुळे-कुशेवाडा) हा बाहेर फेकला जात कारखाली चिरडला गेला. त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. स्वभावाने नम्र असलेल्या रोहनच्या मृत्यूमुळे परुळे-कुशेवाडा गावावर शोककळा पसरली.
या अपघाताची खबर दत्ताराम रत्नाकर राणे (45, रा. कोचरा) यांनी निवती पोलीस ठाण्यात दिली. कार चालक चंद्रकांत सुरेंद्र परुळेकर यांच्या विरोधात BNS 106 (1) 281, 125 ((A) 125 (B) मोटर व्हेईकल ऍक्ट 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळावरून व पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार परुळे-कुशेवाडा येथील चंदकांत सुरेद्र परुळेकर (32) हा मंगळवारी सायंकाळी कुडाळला आला होता. त्याने आपल्या सोबत तेथीलच रोहन सावंतला आणले होते.
त्यानंतर कुडाळहून दोघेही परुळे-कुशेवाडा येथे घरी जाण्यासाठी निघाले होते. कार चंद्रकांत परुळेकर चालवित होते. तर त्यांच्या बाजूला कारमध्ये रोहन सावंत बसला होता. मात्र घरी परतत असताना पिंगुळी-पाट मार्गावर माड्याचीवाडी-करमळगाळू एसटी बसथांब्या नजीक इर्टिका कार आली असता कारचालक चंद्रकांत परुळेकर यांचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कारने आपली दिशा सोडून कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला गटारात जात घळणीला घासत निसाला धडक देत पलटी झाली. त्यावेळी मोठा आवाज झाला. आवाज ऐकूण तेथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
ग्रामस्थांनी तात्काळ पलटी कार उभी केली. कारखाली अडकलेल्या रोहन सावंतला त्यांनी उचलून बाहेर काढले. मात्र यात रोहन हा फेकला गेला होता. तो कारखाली चिरडला गेला. त्याच्या तोंडाला व कंबरेला गंभीर दुखापत झाली होती. तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तेथील ग्रामस्थांनी तात्काळ 108 रुग्ण वाहिकेला संपर्क करून बोलावून घेतले. अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याला मृत्यू घोषित करण्यात आले. मात्र चालक चंद्रकांत परुळेकर यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातात कारच्या दर्शनी व मागील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. कारच्या बॉडीचा पत्रा पूर्ण चपला असून कारची मागील डिकी पूर्ण तुटली आहे. तसेच कारमधील सीटही तुटल्या आहेत. निवती पोलीस रात्री अपघातस्थळी दाखल झाले होते. या अपघाताची नोंद निवती पोलीस ठाण्यात करण्यात आली. अधिक तपास पोलीस श्री. शेटये करीत आहेत. बुधवारी सकाळपर्यंत ईर्टीका कार अपघात स्थळी उभी होती. रोहनच्या पच्छात आई, वडील, भाऊ व अन्य परिवार आहे.
कुडाळ करमळगाळू येथे कार अपघातात तरुणाचा मृत्यू…
