बांदा/प्रतिनिधी
बांदा-पत्रादेवी रस्त्यावर रामनगर येथे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकी अपघातग्रस्त होऊन चालक तुकाराम सावंत-पटेकर (रा. बांदा पानवळ) हा युवक जखमी झाला. युवकाच्या हाताला दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
बांदा पत्रादेवी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. या रस्त्याच्या डागडूजीची वेळोवेळी मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. तुकाराम सावंत पटेकर हे नेहमीप्रमाणे गोव्यात नोकरी निमित्त जात असताना रामनगर येथे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी घसरली. या अपघातात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिकांनी त्यांना बांधा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर खाजगी रुग्णालयात त्यांच्या हातावर उपचार करण्यात आले.
गणेश चतुर्थी सण हा काही दिवसांवर येऊन ठेपल्याने या रस्त्याची वेळीच डागडुजी करण्याची मागणी स्थानिकातून होत आहे.
फोटो:-
खड्ड्यांचा अंदाज न आल्याने बांदा पत्रादेवी रस्त्यावर दुचाकीच अपघात…
