सिंधुदुर्गातील दशावतार कलाकारांसाठी आरोग्य शिबिर…

८ ते १० सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात तपासणी मोहीम..

⚡ओरोस ता ११-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व दशावतार कलाकारांसाठी ८ ते १० सप्टेंबर या कालावधीत जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विविध आजारांवर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून मोफत तपासणी केली जाणार असून कलाकारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा चिकीत्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.
या शिबिराचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून नियोजित दिवशी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ही शिबिरे ठरलेल्या ठिकाणी होणार आहेत. ८ सप्टेंबर रोजी सावंतवाडी विधानसभा मतदार संघात शिबिर आयोजित करण्यात आले असून जिल्हा रुग्णालय येथे दोडामार्ग, वेंगुर्ले आणि सावंतवाडी तालुक्यातील दशावतार कलाकारांची तपासणी होणार आहे. ९ सप्टेंबर रोजी कुडाळ महिला रुग्णालय येथे मालवण आणि कुडाळ तालुक्यातील कलाकारांची तपासणी होणार आहे. १० सप्टेंबर रोजी कणकवली जिल्हा रुग्णालय येथे वैभववाडी, देवगड आणि कणकवली तालुक्यातील कलाकारांची तपासणी होणार आहे.
या शिबिरात सर्व प्रकारच्या आजारांची तपासणी केली जाणार असून, तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहतील. तसेच, नवीन आयुष्मान भारत कार्ड व आभा कार्ड आय डी तयार करण्याची सुविधाही उपलब्ध असणार आहे. ही कार्ड तयार करण्यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक (आधार कार्डशी संलग्न), रेशन कार्ड घेवून कलाकारांनी नियोजित दिवशी उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आरोग्य विभागाने आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी ९४०४७४९०८६, ९४०४४४५०१८ या क्रमांकाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page