मंगेश तळवणेंकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी: शहरातील विविध समस्यांबाबत पालकमंत्र्यांकडे निवेदनद्वारे वेदले लक्ष..
⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी शहरात नगरपरिषद आणि पोलिस स्टेशन मिळून एकूण ७४ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, परंतु त्यापैकी केवळ १५ कॅमेरे सुरू आहेत. तसेच, जे कॅमेरे सुरू आहेत, त्यांची गुणवत्ता चांगली नसल्याने त्यात व्यक्ती स्पष्ट दिसत नाही. शहरात वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी किमान १५० नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी
श्री देव विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी शिक्षण व आरोग्य सभापती, जि.प. सिंधुदुर्ग, श्री. मंगेश तळवणेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, मा. नितेशजी राणे यांना निवेदनद्वारे केली आहे.
तळवणेकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, नुकतेच खासकीलवाडा, लक्ष्मीनगर येथे झालेल्या चोरीचा संदर्भ देत त्यांनी या समस्येची गांभीर्यता अधोरेखित केली. केली आहेत तसेच ते पुढे म्हणाले
सावंतवाडी एस.टी. स्टँडची दुरवस्था झाल्याचे सांगत त्यांनी प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना बसण्यासाठी योग्य जागा नसल्याकडे लक्ष वेधले. पावसाळ्यात प्रवाशांना छत्री घेऊन उभे राहावे लागत असल्याचे नमूद करत त्यांनी स्टँडच्या सुधारणेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.
उपजिल्हा रुग्णालयात सुविधांची कमतरता
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, डॉक्टर आणि आवश्यक मशिनरीची कमतरता असल्यामुळे रुग्णांना उपचारासाठी गोव्याला किंवा बांबुळी येथे पाठवावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून, यावर तातडीने लक्ष घालून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी तळवणेकर यांनी केली.
धोकादायक झाडे तोडण्यासाठी निधीची मागणी
सावंतवाडी शहर, इन्सुली, मळगांव आणि आंबोली घाटातील धोकादायक झाडे तोडण्यासाठी निधीची कोणतीही तरतूद नसल्याचे निदर्शनास आणून दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही कर्मचारी स्वतःच्या खर्चाने ही झाडे तोडत आहेत. त्यामुळे या कामासाठी तातडीने निधीची तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
बोटसेवा वेंगुर्ला किंवा रेडी बंदरापर्यंत वाढवण्याची मागणी
मुंबई ते मालवण प्रवाशांना घेऊन येणारी बोटसेवा पुढे रेडी बंदर किंवा किमान वेंगुर्लापर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यामुळे सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ आणि दोडामार्ग या चार तालुक्यांतील लोकांना फायदा होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
जनता दरबार आयोजित करण्याची विनंती
सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचा जनता दरबार सावंतवाडी येथेच आयोजित करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी तळवणेकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना नम्र विनंती केली आहे
