डॉ. जयेंद्र परुळेकर:जिल्ह्यातील कंत्राटदारांचे ५०० कोटी रुपये अडकले असताना महामार्गाची गरज कोणाला..?
सावंतवाडी: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्यावर जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे. केवळ आश्वासनं आणि भूलथापा देऊन जनतेला फसवले जात असून, या महामार्गाची सावंतवाडी तालुक्यातून गरजच नसल्याचे परखड मत परुळेकर यांनी व्यक्त केले आहे.
दिलेल्या निवेदनातून सत्ताधाऱ्यांवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.’शक्तीपीठ महामार्ग हे एक गाजर’ दाखवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप परुळेकर यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, चष्मा वाटप, सेट टॉप बॉक्स आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या आश्वासनांप्रमाणेच शक्तीपीठ महामार्ग हे सुद्धा एक गाजर आहे. सध्याच्या सरकारने कंत्राटदारांचे ९० हजार कोटी रुपये थकीत ठेवले आहेत, तर एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कंत्राटदारांचे ५०० कोटी रुपये अडकले आहेत. अशा परिस्थितीत ८६ हजार कोटी रुपयांच्या या महामार्गाची गरज कोणाला आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तालुक्यातून सहा महामार्ग का?
परुळेकर यांनी एक धक्कादायक बाब निदर्शनास आणून दिली आहे. ते म्हणाले की, भविष्यात सावंतवाडी हा राज्यातील एकमेव तालुका असेल, जिथून तब्बल सहा महामार्ग जाणार आहेत. यामध्ये मुंबई-गोवा महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग, सागरी महामार्ग, संकेश्वर-बांदा महामार्ग, पनवेल-बांदा महामार्ग आणि सह्याद्री महामार्ग यांचा समावेश आहे. एवढ्या महामार्गांची एकाच तालुक्यात काय गरज आहे? जनतेला येथून दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा घाट घातला जात आहे का, असा संशय त्यांनी व्यक्त केला.