पद्मश्री पुरस्कार विजेते श्री. परशुराम गंगावणे, टीव्ही स्टार विरेश कांबळी अभिनेत्री प्राप्ती रेडकर यांची उपस्थिती..
⚡मालवण ता.०६-:
नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवणच्यावतीने खास महिलांसाठी दि ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या नारळ लढवणे स्पर्धेचे उदघाट्न पद्मश्री पुरस्कार विजेते श्री. परशुराम गंगावणे यांच्या हस्ते आणि टीव्ही स्टार विरेश कांबळी तसेच तारका प्राप्ती रेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण बंदर जेटी येथे होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी दिली आहे
२०१६ पासून मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवणच्यावतीने खास महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा आयोजित करण्यात येत असून यावर्षी या स्पर्धेचे दहावे वर्ष आहे. महिलांच्या सहकार्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे हि दशकपूर्ती साजरी करत आहेत
या स्पर्धेतील विजेत्यांना सोन्या चांदीची दागिने, पैठणी, मोबाईल, अशी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत या दशकपूर्ती सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री. परशुराम गंगावणे, टीव्ही सीरिअल अभिनेते विरेश कांबळी तसेच अभिनेत्री प्राप्ती रेडकर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार दि. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता समुद्राला नारळ अर्पण झाल्यानंतर सिंधुकन्या फुगडी मंडळ, आडवण मालवण यांचा सूप – फुगडी कार्यक्रम होईल, तसेच गोफ नृत्य सादरीकरण होईल. यानंतर महिलासाठी नारळ लढवणे स्पर्धा होईल. त्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रम तसेच लहान मुलांचे कोळी नृत्य सादरीकरण व जादूगार निखिल यांचे जादूचे प्रयोग सादर होणार आहेत.
या स्पर्धेतील विजेत्या महिलांसाठी प्रथम क्रमांक- पैठणी व सोन्याची नथ, सोबत १० लाखाचा विमा व आयुर्वेदिक स्किन केअर किट, द्वितीय क्रमांक- पैठणी व सोन्याची नथ, सोबत १० लाखाचा विमा व आयुर्वेदिक स्किन केअर किट, तृतीय क्रमांक- पैठणी व चांदीची पैंजण व आयुर्वेदिक स्किन केअर किट, चतुर्थ क्रमांक- पैठणी व चांदीची पैंजण व आयुर्वेदिक स्किन केअर किट अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी अथवा पाहण्यासाठी आलेल्या महिलांना सामाजिक संदेश असलेली कुपन देण्यात येणार असून या कुपन द्वारे लकी ड्रॉ काढण्यात येतील, लकी ड्रॉ मधील प्रथम विजेत्यास मोबाईल व इतरांना अन्य बक्षीस देण्यात येईल, तसेच या सर्व महिलांना आर्या हेल्थ क्लब मार्फत हेल्थ वर्क आउट ऑनलाईन लिंक द्वारे आरोग्यविषयी मार्गदर्शन करण्यात येईल. या स्पर्धेत सहभागी होऊन कोणत्याही वर्षी मात्र तीन वेळा प्रथम क्रमांकाने जिंकलेल्या महिलेस विशेष प्रविण्य म्हणून ९ ग्रॅम सोन्याचा हार देण्यात येणार आहे. स्पर्धकांना नारळ मोफत दिले जातील, अशी माहिती श्री. मोंडकर यांनी दिली. तरी जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. मोंडकर यांनी यावेळी केले.