स्थानिक आक्रमक : त्वरीत नेटवर्क सुरू करण्याची माजी सभापती प्रमोद कामत यांची मागणी..
⚡बांदा ता.०५-:
नेतर्डे येथील बीएसएनएलचा टॉवर नेटवर्क अभावी कुचकामी ठरला आहे. गेल्या वर्षभरापासून हा टॉवर असून नसल्यात जमा आहे. नेटवर्क अभावी डिजीटल शिक्षण ही संकल्पना कागदावरच राहिली आहे. याबाबत संबंधित विभागाचे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. येत्या स्वातंत्र्यदिना पर्यंत नेटवर्क सुरू करावे, अशी मागणी माजी जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांनी केली आहे. अन्यथा ग्रामस्थांसमवेत उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे.
महाराष्ट्र – गोवा सीमेवरील नेतर्डे गावात मोबाईलला नेटवर्क नसल्याने गेली अनेक वर्षे मोबाईल टॉवर उभारण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. वर्षभरापूर्वी बीएसएनएलने मोबाईल टॉवर उभारला. मात्र, नेटवर्कची समस्या अद्यापही कायम आहे. नेटवर्क अभावी ग्रामस्थांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
विद्यार्थी, नोकरदार वर्ग, शाळा यांना मोबाईल नेटवर्क अत्यावश्यक बनले आहे. बहुतांशी अभ्यास मोबाईल संबंधित असल्याने नेटवर्क अभावी शिक्षणात अडचणी येत आहेत. गेले वर्षभर नेटवर्क सुरू करण्यासाठी बीएसएनएल कडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, संबंधित विभाग कानाडोळा करीत असल्याचा आरोप प्रमोद कामत यांनी केला आहे. विद्यार्थी व ग्रामस्थांच्या समस्या दूर करण्यासाठी त्वरीत नेटवर्क सुरू करावे अशी मागणी त्यांनी बीएसएनएल कडे केली आहे.