आम. निलेश राणे यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांचा पाठपुरावा..
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या विकास कामांसाठी मंजूर झालेला निधी शासन दरबारी अडकला होता हा निधी प्राप्त व्हावा म्हणून आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे कुडाळ नगरपंचायतीला प्रलंबित असलेल्या निधी पैकी १ कोटी १० लाख एवढा निधी तात्काळ वितरित करण्यात आला आहे.
यासंदर्भात नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी सांगितले की, कुडाळ नगरपंचायतीला सन २०२१- २२ मध्ये नगर विकास विभागाकडून नवीन नगरपंचायतींना सहाय्य अनुदान अंतर्गत चार कामांना रुपये २ कोटी तसेच पाच कामांना २ .०५ कोटी असा निधी मंजूर झाला होता मागील तीन वर्षात प्रत्येकी रुपये ९.५० लाख व रुपये १८.५० लाख असे एकूण रुपये २८ लाख शासनाकडून वितरण झाले होते. उर्वरित निधी मंजूर असून सुद्धा वितरित करण्यात आला नव्हता. या संदर्भात नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी नगराध्यक्षाचा पदभार स्वीकारल्यानंतर याचा आढावा घेतला आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्यात आला. यासाठी आमदार निलेश राणे यांच्याकडे १७ फेब्रुवारी रोजी पत्र सादर करण्यात आले होते. या पाठपुराव्याला आता यश आले आहे .आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शासनाकडे प्रलंबित असलेला रुपये १ कोटी १० लाख एवढा निधी नगर विकास मंत्रालयाकडून कुडाळ नगरपंचायतीला वितरित करण्यात आला आहे. उर्वरित निधी मागणी प्रस्ताव देखील शासनाकडे सादर केला जाणार आहे. या वितरित निधीमधून प्रामुख्याने भंगसाळ येथील गणेश घाट सुशोभीकरण, जिजामाता चौक ते पोलीस स्टेशन पर्यंत मुख्य गटार व दिवाबत्ती व अन्य विकास कामे पूर्णत्वास येणार आहेत. एकंदरीत मागील दोन वर्ष ठप्प असलेल्या विकास कामाला वेग मिळणार असून कुडाळ नगरपंचायतीच्या महत्त्वकांक्षी विकास कामे मार्गी लागणार आहेत. असे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी सांगितले.