भाजप म्हणून तुम्ही किती सक्षम आहात याचे आत्मपरीक्षण करा…

माजी उपसभापती प्रसाद मोरजकर यांचा भाजप पदाधिकाऱ्यांना सल्ला..

⚡मालवण ता.३०-: शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत महायुतीत मिठाचा खडा टाकतात असे म्हणण्यापेक्षा लोक त्यांच्याकडे का जातात, भाजप म्हणून तुम्ही किती सक्षम आहात, याचे आत्मपरीक्षण भाजप पदाधिकाऱ्यांनी करावे. आज दत्ता सामंत शिवसेनेचा झेंडा घेऊन गावागावात पोहोचत असताना तुम्ही भाजप म्हणून किती गावात पोहोचलात ? बाबा मोंडकर हे शहर मर्यादित नेतृत्व असून त्यांनी तालुक्याच्या राजकारणावरून केलेली टीका चुकीची आहे, अशी टीका मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रसाद मोरजकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

भाजपचे मालवण शहराध्यक्ष व रविकिरण तोरसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत हे भाजपचे कार्यकर्ते फोडून त्यांचा शिवसेनेत प्रवेश करत असल्याची टीका केल्यावर या टिकेवरून माजी उपसभापती प्रसाद मोरजकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.

ग्रामीण भागातील काही पदाधिकाऱ्यांनी आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी शिवसेनेत प्रवेश केला. यात शहरातील कोणीही नव्हते. त्यामुळे या बाबत भाजप तालुकाध्यक्षांनी प्रतिक्रिया दिली असती तर ते स्वाभाविक होते, पण शहराध्यक्ष असलेल्या बाबा मोंडकर यांनी या विषयात बोलणे चुकीचे आहे. जे पदाधिकारी शिवसेनेत गेले असे तुम्ही म्हणता त्यांच्याशी तुम्ही संपर्क केला का ? ते कोणत्या कारणाने तुमची साथ सोडून गेले विचारले का ? त्यांना कोणती आमिषे दत्ता सामंत यांनी दिली ? वास्तविक तुमच्या सोबत राहून गावातील विकास कामे होत नसतील तर ते इतरत्र न जाता महायुतीतीलच एका घटक पक्षात गेले तर चुकीचे काय ? शेवटी दोन्ही पक्षातील कार्यकते हे खासदार नारायण राणे यांचेच आहेत, असे प्रसाद मोरजकर यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात भाजपच्या वतीने रक्तदान शिबीर ठेवण्यात आले होते. त्याचे निमंत्रण देखील आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना दिले गेले नाही. तरी देखील आम्ही काहीजण तेथे गेलो. येथे रक्तदान करणाऱ्यांना चहा, पोहे देण्यात आले. मात्र ग्रामीण भागातून या कार्यक्रमाला आलेल्या कार्यकर्त्यांना पिण्यासाठी पाणी पण दिले गेले नाही. या कार्यक्रमाला शहरातील २५ ते ३० कार्यकर्ते व ग्रामीण भागातील २५ ते ३० कार्यकर्ते उपस्थित होते. मग तुम्ही नेमलेले बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख राहिले कुठे याचा विचार करावा. तुम्ही पक्ष म्हणून किती लोकांपर्यंत पोहोचता ? असा सवाल प्रसाद मोरजकर यांनी केला आहे.

खासदार नारायण राणे हे निवडून येऊन सव्वा वर्षाचा कालावधी लोटला आहे. या कालावधीत विकास कामांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी तुम्ही किती लोकांशी संपर्क केला ? उबाठा मधून अनेकांनी भाजपात प्रवेश केला, त्यांची एकदा तरी विचारपूस केली आहे का ? कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला स्वतःच्या मर्जीने पक्ष बदलण्याचा अधिकार आहे. उद्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महायुती झाल्यास दोन्ही पक्षांना ज्या जागा मिळतील, त्या निवडून आणण्यासाठी दोघांनाही एकमेकांची गरज आहे, याचा विचार बाबा मोंडकर व सहकाऱ्यांनी करावा, तसेच या टिकेने खचून न जाता दत्ता सामंत यानी अधिक त्वेषाने आपले सामाजिक कार्य सुरु ठेवावे, कारण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये शंभर टक्के यश शिवसेना भाजपाला मिळाले पाहिजे, असेही प्रसाद मोरजकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page