⚡मालवण ता.२९-:
जिल्ह्यात होत असलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मालवणचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण शहर परिसरात नाकाबंदी करत वाहनांची कसून तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये गेल्या दोन महिन्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यात अचानक नाकाबंदी तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिल्या आहेत. त्यानुसार मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण शहरातील देऊळवाडा येथील मुख्य रस्त्यावर नाकाबंदी करत शहरात दाखल होणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. या तपासणी मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक, महिला, पुरुष पोलीस कर्मचारी सहभागी झाले आहेत.