वेंगुर्ले येथील मानसिश्वर पुला नजीक खाडी किनारी ३५ वर्षीय व्यक्तीचा आढळला मृतदेह…

⚡वेंगुर्ले ता.२९-:
वेंगुर्ले येथील मानसिश्वर पुला नजीक खाडी किनारी आज मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साधारण ३५ वर्ष वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. वेंगुर्ले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे.
आज दुपारी मानसिश्वर पुला नजीक खाडी किनारी एक मृतदेह दिसत आहे अशी माहिती वेंगुर्ले पोलीस ठाण्यात मिळाली. त्यामुळे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी पोलीस कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यावेळी किनाऱ्यावर पाण्यामध्ये साधारण ३५ वर्षे वय असलेल्या व्यक्तीचा मृतदेह दिसून आला. पोलिसांनी उपस्थित ग्रामस्थांच्या मदतीने पंचनामा करून मृतदेह पाण्याबाहेर काढला. यावेळी हेड कॉन्स्टेबल भगवान चव्हाण, पोलीस हवालदार योगेश राऊळ, महिला पोलीस दीपा मटकर, पोलीस पांडुरंग खडपकर, मनोज परुळेकर तसेच उभादांडा पोलीस पाटील नार्वेकर, नवाबाग पोलीस पाटील केळुस्कर, तसेच नाथा वेंगुर्लेकर, तुषार साळगावकर, उपेंद्र तोटकेकर आदी उपस्थित होते. या सर्वांनी मिळून मृतदेह बाहेर काढला.
मृत व्यक्तीच्या अंगावर निळसर काळसर रंगाचे हाफ शर्ट, जीन्स पॅन्ट आहे. या व्यक्ती बाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्याची संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दरम्यान रविवारी आठवडा बाजार दिवशी याच ठिकाणी कुणीतरी बुडल्याचे बोलले जात होते. ती बुडालेली व्यक्ती हीच असावी असा अंदाज स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page