खड्डे चुकवायच्या प्रयत्नात वारंवार होतात अपघात..
⚡मालवण ता.२९-: मालवण धामापूर कुडाळ या मुख्य रस्त्यावर धामापूर ते नेरुरपार दरम्यानच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झालेली आहे. रस्त्यात खड्डे आहेत कीं खड्ड्यात रस्ता हेच वाहन चालकांना समजत नाही अशीच काहीशी दुरवस्था या रस्त्याची झालेली आहे.
गेल्या काही वर्षात मालवण - चौके - धामापूर - कुडाळ या मार्गावरील वाहतूक मोठया प्रमाणात वाढलेली असून त्यामध्ये छोट्या वाहनांसोबतच अवजड वाहनांचीही लक्षणीय वाढ झालेली आहे. त्या तुलनेत हा रस्ता त्या प्रतीचा मात्र बनविला जात नाही. सदर रस्ता डागडुजी साठी खर्च करण्यात आलेले लाखो रुपये मात्र वाया जात असून दरवर्षी पावसाळ्यात धामापूर ते नेरुरपार दरम्यान च्या या रस्त्यावर शेकडो खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था होतं असते. त्यामुळे सध्याच्या वाहन क्षमते नुसार हा रस्ता बनवणे आवश्यक आहे.
दरम्यान सध्या या रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठया खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मात्र कसरत करावी लागत आहेत. विशेष करून दुचाकी स्वार आणि रिक्षा चालक यांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बऱ्याचदा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात या परिसरात वारंवार अपघात ही होत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरील खड्डे तातडीने बुजावावेत अशी मागणी वाहन चालक आणि स्थानिक रहिवाशी यांच्या कडून होत आहे.