कुडाळ : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कुडाळच्या अध्यक्षपदी संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्रा. संतोष वालावलकर यांची तर कार्यवाहपदी सुरेश पवार यांची निवड करण्यात आली आहे. सन २०२५ ते २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
कोकण मराठी साहित्य परिषद कुडाळ शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा ज्येष्ठ लेखिका सौ.वृंदा कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच को.म.सा.प. जिल्हाध्यक्ष मंगेश मसके व निरीक्षक कवी विठ्ठल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये पार पडली. यावेळी सन २०२५ ते २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. बोलीभाषा अभ्यासक प्रा. संतोष वालावलकर यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी प्रा.डॉ. दीपाली काजरेकर आणि सौ.स्नेहा फळसणकर तसेच कार्यवाहपदी सुरेश पवार, सहकार्यवाह सौ.स्वाती सावंत, कोषाध्यक्ष गोविंद पवार, जिल्हा प्रतिनिधी मंगेश मसके तर सदस्य म्हणून कवी अनंत वैद्य, सौ.वृंदा कांबळी, प्रा.अरूण मर्गज, संदीप साळसकर यांची निवड करण्यात आली आहे.
को.म.सा.प.चे कार्य सर्वांच्या सहकार्याने व सर्वांना विश्वासात घेऊन आपण करणार असल्याचे सांगून मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला आहे त्याच वर्षी आपली अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे हा अविस्मरणीय क्षण असल्याच्या भावना नूतन अध्यक्ष प्रा.संतोष वालावलकर यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या. प्रा.संतोष वालावलकर हे संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचे अधिव्याख्याता व य.च.म.मुक्त विद्यापीठाच्या कुडाळ अभ्यासकेंद्राचे केंद्रसंयोजक या पदावर कार्यरत आहेत. को.म.सा.प.चे संस्थापक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या ‘माहीमची खाडी’ या कादंबरीवर महानगरीय साहित्य स्वरूप विशेष या पुस्तकामध्ये तसेच आदिवासी साहित्य या पुस्तकामध्ये त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. कविता, कथा, ललित लेखन, संशोधनपर लेख विविध वर्तमानपत्रं, मासिके,
त्रैमासिकांमधून प्रसिद्ध झालेले आहेत. आकाशवाणीवर युवावाणी कार्यक्रमात कथाकथन, मुंबई दूरदर्शनच्या धीना धीन धा या कार्यक्रमात संशोधनात्मक लोकनृत्य सादर केलेली असून, महाविद्यालयीन दशेत आदर्श विद्यार्थी, य.च.म.मुक्त विद्यापीठ, विभागीय केंद्राचा आदर्श शिक्षक, नृत्य सन्मान विशेष पुरस्कार असे काही पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. कथालेखन, अभिनय, चित्रकला, रांगोळी आदी कलाप्रकारामध्येही त्यांना परितोषिकेही मिळालेली आहेत. साहित्य, नाट्य, नृत्य,
सुलेखन आणि ललित कलेची अभिरूची महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी जोपासलेली आहे. को.म.सा.प.च्या अशा विविधांगी व्यक्तिमत्त्वाची तालुकाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
मावळत्या तालुकाध्यक्षा सौ.वृंदा कांबळी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कार्यकारिणीच्या विविध समित्या गठित करण्यात येणार असल्याचे सांगून विविध उपक्रमांविषयी सविस्तर चर्चा केली. यावर्षापासून ज्येष्ठ लेखिका कै.कुमुदताई रेगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कुडाळ शाखेचा कै.कुमुदताई रेगे यांच्या नावे पुरस्कार देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पिंगुळी गावाचे उपसरपंच म्हणून निवड झाल्याबद्दल मंगेश मसके व कवी विठ्ठल कदम यांच्या बालसाहित्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश झाल्याबद्दल कवी विठ्ठल कदम यांचा कुडाळ शाखेच्या वतीने तालुकाध्यक्षा सौ.वृंदा कांबळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कवी विट्ठल कदम यांनी विविध योजनांची माहिती देत तसेच कवी अनंत वैद्य यांनी साहित्य – शिक्षण नव्या पिढीकडे कसे पोहचवता येईल हे सांगत आपले विचार व्यक्त केले.
तालुकाध्यक्षा सौ.वृंदा कांबळी, जिल्हाध्यक्ष मंगेश मसके आदी सर्वांनी नूतन अध्यक्ष व कार्यकारिणीचे अभिनंदन केले. सौ.स्नेहा फळसणकर यांनी सर्वांचे आभार मानले.
कोमसाप कुडाळ शाखा अध्यक्षपदी प्रा.संतोष वालावलकर…
