संजू परब यांचा आरोप: नारायण राणेंना ते मानत असते तर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली नसती, परंतु त्यांचा बोलवता धनी हा वेगळा..
⚡सावंतवाडी ता.२९-: जिल्ह्यातील महायुती संदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केलेली तक्रार लक्षात घेता, आगामी काळात आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांना मंत्रिपदे मिळू शकतात या भीतीपोटी त्यांनी केलेला ढोंगीपणा आहे, तर माझ्यासह दत्ता सामंतावर त्यांनी केलेले आरोप पाहता त्यांचा बोलवता धनी हा वेगळा असल्याची टिका शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केली.
तर माझे नेते नारायण राणेच आहे हे प्रभाकर सावंताना आठवण करून देण्याची गरज नाही, मुळात तेच राणेंना मानत असते तर,त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याऐवजी नारायण राणे यांच्याकडे केली असती त्यामुळे युती संदर्भातील जो काही निर्णय राणे देतील तो आम्हाला मान्य असेल असेही श्री परब म्हणाले.श्री परब यांनी आज येथे पत्रकार परिषद घेत भाजपा जिल्हाध्यक्ष श्री सामंत यांच्या आरोपांचा खरपून समाचार घेतला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख झेवियर डिसोजा ,तालुकाप्रमुख बबन राणे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, परीक्षित मांजरेकर,अर्चित पोकळे, निखिल सावंत, बंटी पुरोहित, कैलेट्स फर्नांडिस, आदी उपस्थित होते