देशहित जपणारा प्रत्येक जण सैनिकच…

सुभेदार मेजर संजय सावंत:बांदा खेमराज प्रशालेत कारगिल विजय दिन उत्साहात साजरा..

⚡बांदा ता.२७-: ज्या देशात आपण राहतो त्या मातृभूमीचे आपण देणं लागतो. प्रत्येकाने राष्ट्रहिताचा विचार प्रथम केला पाहिजे. त्यानंतर आपलं हित पाहिलं पाहिजे. देश माझ्यासाठी नव्हे, तर मी देशासाठी आहे हा विचार मनात बिंबवला पाहिजे. घराघरात आई जिजाऊ व तिच्या शिकवणीने छत्रपती शिवराय घडले पाहिजेत.केवळ देशासाठी सीमेवर लढतो तोच सैनिक असतो असं नाही ,तर आपले कर्तव्य पार पाडत जो सदैव देशहीत जपतो तो प्रत्येकजण सैनिकच असतो .असे प्रतिपादन सुभेदार मेजर संजय लक्ष्मण सावंत यांनी बांदा येथे केले .बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल आणि डॉ. व्ही. के. तोरसकर ज्युनियर कॉलेज यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे प्रशालेमध्ये कारगिल विजय दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून कॅप्टन लक्ष्मण सावंत, ओरोस ट्रेनिंग जेसीओ सुभेदार वेणूधार साहू, एनसीओ मेजर प्रदीप पाटील, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, हवलदार अजित सावंत ,धोंडीराम सावंत,प्रा.पि.यू.देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
देशावर प्रेम करा, जीवनात हार मानू नका, शिस्त पाळा, योग्य आहार घ्या, तंदुरुस्त रहा, माता-भगिनींचा सन्मान करा, कर्तव्यदक्ष रहा,वडिलधारे लोक व गुरुजनांचा आदर करा ,मैदानी खेळात भाग घ्या आणि नम्रता कधीही सोडू नका अशी शिकवण सुभेदार मेजर संजय सावंत त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना दिली.तसेच ऑपरेशन सिंदुरसह अनेक लढायांचे अनुभव सांगितले.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद् घाटन झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी समरगीत सादर केले. कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली .उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून प्रेरणादायी मार्गदर्शन केले .तसेच विद्यार्थ्यांनीही भाषणातून सैनिक व देशाचे सेवा बद्दल आपले विचार मांडले .यावेळी घेण्यात आलेल्या वक्तृत्व निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत प्रा. पि.यू.देसाई ,पर्यवेक्षक पी. एस. सावंत ,प्रा अनिकेत सावंत व प्रा. सुमेधा सावळ यांनी केले. प्रास्ताविक रणधीर रणसिंग यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. अरुण सुतार यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

फोटो ( बांदा खेमराज प्रशालेत कारगिल विजय दिन कार्यक्रमात पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांसह मान्यवर )

You cannot copy content of this page