अजयराज वराडकर:कौशल्य अभ्यासक्रम (MSFC) प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न..
⚡मालवण ता.२७-:
आज शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेली प्रचंड स्पर्धा लक्षात घेऊन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने कट्टा परिसर व दशक्रोशीतील विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाबरोबर व्यावसायिक कौशल्य असणारे शिक्षण देऊन स्वावलंबी बनवू असा निर्धार बाळगला होता. हा निर्धार आज साध्य होताना दिसत असून रोजगाराभिमुख शिक्षणातून नव्या दिशा देण्याचे कार्य हे परमकर्तव्य असून योगात्मा डॉ.काकासाहेब यांच्या प्रेरणेची ही शक्ती असून असेच कार्य आपण संस्था व सहकाऱ्यांच्या मदतीने करू, असे प्रतिपादन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. अजयराज वराडकर यांनी केले.
कट्टा येथील वराडकर हायस्कुलमध्ये बहुविध कौशल्य अभ्यासक्रम (MSFC) प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी अजयराज वराडकर हे बोलत होते. यावेळी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाच्या सचिव श्रीमती विजयश्री देसाई, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, खजिनदार रविंद्रनाथ पावसकर, संचालक सौ.स्वाती वराडकर, महेश वाईरकर, सौ.श्रध्दा नाईक, मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे, पर्यवेक्षक महेश भाट, पालक, हितचिंतक, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सुनील नाईक यांनी भविष्यातील नोकरीचा पर्याय म्हणून रोजगाराच्या संधीचे महत्व विषद करताना संस्थेने आर्थिक जोखीम उचलून केलेल्या प्रयत्नाविषयी समाधान व्यक्त केले.
यावेळी ध्रुवी महेश भाट (प्रथम क्रमांक), मयुरी दिनेश पेडणेकर, त्रिशा ऋषिकेश नाईक, हर्षल प्रकाश कानुरकर, कोमल अनिल गावडे (द्वितीय क्रमांक), वैष्णवी महादेव चव्हाण (तृतीय क्रमांक) यांच्यासह ७० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करून त्यांचा गौरव करण्यात आला
या निमित्ताने विभागामार्फत प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशन हडलगेकर यांनी केले.