भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवाची आज सांगता नसून ही नवी सुरुवात आहे…

श्री. अच्युत भोसले – सावंत:सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ उत्साहात संपन्न..

⚡मालवण ता.२७-:
आजच्या बदलत्या शिक्षण पद्धतीमुळे आणि पालक मुलांच्या शिक्षणासाठी इंग्रजी शाळांकडे वळत असल्यामुळे मुलांमध्ये नविन्याची कमतरता दिसून येते. आजची पिढी मितभाषी झाली असून आपल्या भावना मांडू शकत नाही. मात्र भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांमधील नाविन्याला व गुणांना वाव देणारी शिक्षणसंस्था आहे, त्यामुळे या संस्थेचा हेवा वाटतो, भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवाची आज सांगता नसून ही नवी सुरुवात आहे, असे प्रतिपादन सावंतवाडी चराठा येथील भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष श्री. अच्युत भोसले – सावंत यांनी येथे बोलताना केले.

भंडारी एज्युकेशन सोसायटी संचलित भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय मालवण च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ मालवण येथील संस्थेच्या भंडारी हायस्कूल सभागृह येथे संपन्न झाला. प्रारंभी माजी विद्यार्थी आणि प्रसिद्ध संगीतकार गायक शिवहरी रानडे यांचा संगीत कार्यक्रम सादर झाला. त्यास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यानंतर मुख्य समारंभात प्रमुख पाहूणे चराठा सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष श्री. अच्युत सावंत- भोसले यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भंडारी एज्युकेशन सोसायटीचे ऑनररी जनरल सेक्रेटरी श्री. साबाजी करलकर, माजी ऑनररी जनरल सेक्रेटरी यश केरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, संस्था पदाधिकारी अभिमन्यू कवठणकर, रामदास मयेकर, दशरथ कवटकर, मुख्याध्यापक हणमंत तिवले, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, प्रा. पवन बांदेकर, माजी विद्यार्थी रुजारिओ पिंटो, चेतन आजगावकर, भूषण मेतर, हेमराज सावजी, अनिकेत फाटक, अमृता फाटक, हेमंत शिरगांवकर, ललित चव्हाण, प्रवीण पवार, शुभम मेस्त्री आदी उपस्थित होते.

प्रारंभी प्रा. पवन बांदेकर यांनी प्रास्ताविक तर सुविधा कासले – जाधव यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. यावेळी अच्युत भोसले – सावंत व साबाजी करलकर यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. गायक शिवहारी रानडे यांचा उल्लेखनीय कामगिरीसाठी सत्कार करण्यात आला. यावेळी सुवर्ण महोत्सवातील सर्व कार्यक्रमांसाठी सहकार्य करणाऱ्या, भंडारी हॉलच्या नूतनीकरणासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व आजी व माजी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच ज्युनिअर कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या सुवर्णभरारी या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. स्मरणिकेचे संपादक भूषण मेतर यांनी स्मरणिकेविषयी माहिती दिली. अमृता फाटक यांनी सुवर्णमहोत्सवाचा आर्थिक लेखाजोगा मांडला.

यावेळी साबाजी करलकर यांनी अध्यक्षीय भाषणात माजी विद्यार्थी हे शाळेची मोठी संपत्ती आहेत. शाळा व कॉलेजच्या यशात आजी माजी विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे, असे सांगितले. यावेळी यश केरकर, रामदास मयेकर यांनीही विचार मांडले. तर शिवहरी रानडे, ललित चव्हाण, सागर जाधव, प्रवीण पवार यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन सौगंधराज बादेकर यांनी केले. आभार प्रा. गुरूदास दळवी यांनी मानले. यावेळी आजी – माजी विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व इतर नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page