⚡कणकवली ता.२७-: तालुक्यातील सांगवे संभाजीनगर येथील श्यामसुंदर विष्णू सावंत यांच्या बंद घरातून चोरट्यांनी २० तोळ्यांचे सोन्याचे दागिने व ४० हजारांची रोख रक्कम लंपास केली आहे. या चोरी प्रकरणातील संशयित चोरट्यांचा कसून शोध पोलिस घेत आहेत. त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून चोरट्यांचा काही मागोवा लागतो का ? हे बघितले जात आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.
श्यामसुंदर सावंत यांच्या घराच्या दरवाजाच्या कुलपाची चावी घराबाहेरीलच एका बॉक्समध्ये ठेवलेली होती. चोरट्याने ती चावी घेऊन कुलूप उघडून घरात प्रवेश करत ही चोरी केली.
त्यामुळे आसपासच्या परिसरातील कोणी माहीतगार व्यक्तीचा या चोरीत हात आहे का? यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत. तसेच सावंत यांच्या घरापासून जवळच असलेल्या एका सीसीटीव्हीमध्ये एक दुचाकी चालक दिसत आहे. मात्र, त्याचा चेहरा दिसत नाही. अजूनही त्या परिसरात काही सीसीटीव्ही आहेत का ? याचा शोध घेतला जात आहे.
या चोरीप्रकरणी संशय आल्याने एका कामगाराला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची चौकशी केली. मात्र, त्यामधून काही निष्पन्न होऊ शकलेले नाही. काही संशयितांचीही चौकशी करण्यात येत आहे. तसेच तालुक्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करून पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांना सतर्क रहाण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.