⚡बांदा ता.२७-: बांदा येथील इनरव्हील क्लबचा २०२५-२६ या वर्षासाठीचा पदग्रहण सोहळा श्री स्वामी समर्थ हॉल, बांदा येथे नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सावंतवाडी इनरव्हील क्लबच्या सौ. सुमेधा धुरी यांनी नवे पदाधिकारी जाहीर केले. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. पल्लवी जोशी व सौ. बाड मॅडम उपस्थित होत्या.
नवीन कार्यकारिणीत अध्यक्षा म्हणून प्रियांका हरमलकर, सचिव म्हणून निनता गोवेकर, खजिनदार म्हणून अक्षता साळगांवकर, आंतर क्लब अधिकारी म्हणून चित्रा भिसे आणि माहिती अधिकारी म्हणून माधवी गाड यांनी आपापल्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. यावेळी कार्यकारिणी सदस्य रुपाली शिरसाट, माजी अध्यक्षा अर्चना पांगम, श्वेता येडवे, श्रुती वळंजू, राखी कळंगुटकर व मृणाल तोरसकर उपस्थित होत्या. तसेच भक्ती आळवे यांचा नवीन सदस्य म्हणून क्लबमध्ये प्रवेश झाला.
माजी अध्यक्षा अर्चना पांगम यांनी आपल्या भाषणात मागील वर्षभरातील कामांचा आढावा घेतला. “माझ्या अध्यक्षीय काळात क्लबने महिलांसाठी अनेक चांगले उपक्रम राबवले. मला आनंद आहे की नवीन कार्यकारिणीकडूनही हे काम नव्या जोमाने पुढे नेले जाईल,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी सर्व सदस्य व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.
नवीन अध्यक्षा प्रियांका हरमलकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल मी सर्वांची ऋणी आहे. महिलांसाठी नवे उपक्रम राबवून क्लबचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा माझा प्रयत्न असेल. सर्वांच्या सहकार्याने हे शक्य होईल,” असे त्या म्हणाल्या.
क्लबतर्फे महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी रानभाज्यांची पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण ११ महिलांनी सहभाग घेतला. यामध्ये पहिले बक्षीस साक्षी आमोरेसरकर यांना, दुसरे बक्षीस शिल्पा धामापुरकर यांना, तिसरे बक्षीस प्रणिता पडवळ यांना तर उत्तेजनार्थ बक्षीस अर्चना महाले व वर्षा आगलावे यांना मिळाले.शेवटी खजिनदार अक्षता साळगांवकर यांनी सर्वांचे आभार मानले.
बांदा येथील इनरव्हील क्लबचा २०२५-२६ वर्षासाठीचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न…!
