हरी खोबरेकर:मच्छिमार आपल्याकडे यावेत, त्यांची मते मिळावीत यासाठी पालकमंत्री, खासदार, स्थानिक आमदारांची धडपड सुरू..
⚡मालवण ता.२४-:
गेल्या दहा वर्षाच्या काळात किनारपट्टीवरील मच्छिमारांच्या सीआरझेड प्रश्नाबाबत माजी आमदार वैभव नाईक व माजी खासदार विनायक राऊत आवाज उठवत राहिले, या काळात कधीही मच्छिमारांना सीआरझेड कायद्याबाबत नोटीसा बजावल्या गेल्या नाही. मात्र आताच मच्छिमारांना नोटीसा का बजावल्या जात आहेत, यामागचे गूढ काय असा सवाल करत किनारपट्टी आपल्या ताब्यात नसल्याने मच्छिमार आपल्याकडे यावेत, त्यांची मते मिळावीत यासाठी विद्यमान आमदार, खासदार व पालकमंत्री यांचा प्रयत्न आहे, असा आरोप उबाठा शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
मालवण येथील उबाठा शिवसेना शाखेत पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उमेश मांजरेकर, बाबी जोगी, मंदार ओरसकर, स्वप्निल आचरेकर, निनाक्षी मेतर, सिद्धेश मांजरेकर, गौरव वेर्लेकर, हेमंत मोंडकर, प्रसाद चव्हाण, चिंतामणी मयेकर
महादेव कोळंबकर आदी उपस्थित होते.
यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, किनारपट्टीवरील मच्छिमारांसाठी दहा वर्षापूर्वीचा काळ पुन्हा आला आहे. आता मच्छिमारांना सीआरझेड बाबत नोटीसा का बजावल्या जात आहेत, असा यांचा पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे यांना प्रश्न आहे. पालकमंत्री हे स्वतः मत्स्योद्योग मंत्री आहेत, मात्र समुद्रात सुरु असलेल्या बेछुट एलईडी व इतर अनधिकृत मासेमारीवर सुरु आहे, आजही ते गस्ती नौका देऊ शकलेले नाही, याकडे दुर्लक्ष का करतात? मत्स्य विभागात सक्षम अधिकारी नाहीत याकडेही लक्ष नाही. पारंपारिक मच्छिमारांना केवळ आश्वासने दिली जात आहेत. मात्र मच्छिमारांचे म्हणणे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी आमदार वैभव नाईक व माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्फत आम्ही प्रयत्न करू, प्रसंगी न्यायालयात जावे लागले तरी आम्ही जाऊ, असेही हरी खोबरेकर म्हणाले.