⚡बांदा ता.२४-: रोटरी क्लब ऑफ बांदा आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ, बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानगंगा या उपक्रमांतर्गत खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, बांदा येथील आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी समुपदेशन वर्ग घेण्यात आला.
या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासातील रुची वाढते, विचारशक्ती विकसित होते आणि भविष्यात शालेय शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करता येते, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार नाईक यांच्या प्रास्ताविकाने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ बांदा चे अध्यक्ष शिवानंद भिडे, माजी अध्यक्ष सीताराम गावडे, रोटरॅक्ट क्लब अध्यक्ष रोहन कुबडे आणि अवधूत चिंदरकर उपस्थित होते.
ओंकार पावस्कर आणि डिंपल कुबडे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे फायदे सोप्या भाषेत समजावले. शिवानंद भिडे यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, मुलांनी लहान वयातच स्पर्धा परीक्षांचा सराव केल्यास पुढे शिक्षण आणि नोकरीसाठी खूप उपयोग होतो. रोटरी क्लब पुढील तीन वर्ष या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, शिक्षण हे विद्यार्थ्यांना समजेल अशाच भाषेत व्हावे आणि मूलभूत शिक्षण पक्का झाल्यास भविष्यात यश नक्की मिळते. शिष्यवृत्ती परीक्षांसाठी प्रयत्न केल्यास आत्मविश्वास वाढतो आणि मुलाखती किंवा अन्य परीक्षांमध्ये फायदा होतो.
या वेळी रोटरी क्लबचे बाबा काणेकर, यशवंत आळवे, आबा धारगळकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत वेंगुर्लेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार डिंपल कुबडे आणि प्रमोद सावंत यांनी मानले.
या मार्गदर्शनामुळे अनेक पालक आणि विद्यार्थी समाधानी दिसून आले आणि सर्वांनी पुढील काळात या परीक्षांसाठी योग्य तयारी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
फोटो:-
बांदा खेमराज हायस्कुल मध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना शिवानंद भिडे. सोबत इतर.
