आरोंदा येथील फेरफार प्रकरणाच्या अपिलीय सुनावणी दुसऱ्या अधिकाऱ्यांमार्फत करावी:शेतकरी मच्छीमारांची मागणी..
⚡सावंतवाडी ता.२४-:
सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा येथे जमिनीवर घरे आणि मालकी असतानाही परस्पर विक्री झाल्याचे भासवून मच्छीमारांना बेघर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, याविरोधात मच्छीमार आणि ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन दिले. मंडळ अधिकारी आजगाव यांच्याकडून अपिलीय सुनावणी काढून घेण्याची मागणी केली.
आरोंदा येथील फेरफार क्रमांक २५०७ ची अपिलीय सुनावणी सध्याचे मंडळ अधिकारी श्री. कैलास गावडे यांच्याकडून निष्पक्षपातीपणे होणार नाही, असा दावा करत, ही अपिलीय सुनावणी अन्य अधिकाऱ्याकडे वर्ग करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
चौकशी अधिकाऱ्याच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह:
निवेदनानुसार, आरोंदा येथील फेरफार क्रमांक २५०७ ची सुनावणी आजगाव मंडळ अधिकारी यांच्याकडे प्रलंबित आहे. सध्या या मंडळावर श्री. कैलास गावडे कार्यरत आहेत. २१ जुलै रोजी ही सुनावणी निश्चित करण्यात आली होती. मात्र, मंडळ अधिकारी गावडे यांच्या वर्तनावरून त्यांनी फेरफारातील वर्दी देणाऱ्या कंपनीशी हातमिळवणी केल्याचा संशय मच्छीमारांनी व्यक्त केला आहे. त्यांच्याकडे यासंदर्भात खात्रीलायक पुरावे असल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे.
मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार, श्री. कैलास गावडे हे त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी न देता, सदर फेरफार कंपनीच्या बाजूने निर्णय देतील असे त्यांच्या वर्तनावरून दिसून येत आहे. यामुळे मच्छीमार आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांचे नुकसान होणार असून, त्यांना त्यांच्या जमिनीपासून, घरादारापासून आणि शेती/मच्छीमारीपासून वंचित राहावे लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
तहसीलदारांकडून कारवाईचे आश्वासन
या गंभीर परिस्थितीमुळे, फेरफार क्रमांक २५०७ चे कामकाज श्री. कैलास गावडे यांच्याकडून काढून घेऊन, ते अन्य कोणत्याही सक्षम मंडळ अधिकारी किंवा महसूल अधिकाऱ्याकडे वर्ग करण्याची मागणी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.
ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ आणि तालुका प्रमुख मायकल डिसोझा यांच्या उपस्थितीत मच्छीमार गोकुळदास मोठे, रघुवीर पेडणेकर, अनंत चांदेकर, रामदास पेडणेकर, बलवंत शिवलकर, प्रथमेश नवघरे, भरत कोरगावकर, हरिचंद्र कोरगावकर, सुरेश सारंग आणि अन्य मच्छीमार बांधवांनी हे निवेदन दिले. तहसीलदार श्रीधर पाटील यांनी या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.