⚡सावंतवाडी ता.२३-: बाहेरचावाडा परिसरात ६२ ग्रॅम गांजा बाळगल्याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित विशाल वडार (रा. कोलगाव) याला सावंतवाडी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल वडार याला स्वरूप हॉस्पिटलच्या पाठीमागील जंगल परिसरातून ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी त्याच्याकडे ६२ ग्रॅम गांजा आढळून आला होता. याप्रकरणी त्याच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल वडारसोबत आणखी काही युवक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.